वाहनचालकास मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल न केल्याने टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी कळंबा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी संतापलेल्या कृती समितीच्या सदस्य दीपाताई पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यास चपलेचा प्रसाद दिला. त्यांच्यासह अन्य महिलांनी टोल नाक्यावरील बॅरेकेट्स फेकून दिले. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. याशिवाय कृती समितीने पोलिसांना दखलपात्र गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
आयआरबी कंपनीचे कर्मचारी शहरात टोल आकारणीचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना उर्मट वर्तणूक मिळत असल्याची तक्रार वाहनधारकांसह टोलविरोधी कृती समितीने केली होती. कळंबा टोल नाक्यावर बुधवारी नितीन राजाराम चव्हाण (रा. वाळवे ता. राधानगरी) या ट्रक चालकाकडे कर्मचाऱ्यांनी टोल रकमेची मागणी केली. चव्हाण यांनी टोल देणार नाही असे सांगितले. तेव्हा टोल नाक्यावरील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी चव्हाण यास बेदम मारहाण केली. हा प्रकार समजल्यानंतर टोलविरोधी कृती समितीने संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
गुरुवारी कृती समितीला पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समजली. दुपारी कृती समितीचे पदाधिकारी पुन्हा एकदा टोलनाक्यावर पोहोचले. कृती समितीचे अध्यक्ष निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, दिलीप पवार आदींनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना उर्मट वर्तणुकीचा जाब विचारला. चर्चा सुरू असताना दीपाताई पाटील यांनी काल कोणत्या कर्मचाऱ्याने मारहाण केली असा प्रश्न विचारला. मारहाण करणारा कर्मचारी पुढे आला. त्याला पाहताच पाटील यांनी चप्पल काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सारेजण गडबडून गेले. संतापलेल्या पाटील यांना आवरणे कठीण झाले होते. कृती समितीच्या सदस्यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबविला. तरीही पाटील यांचा राग धुमसतच होता. त्यांनी टोल नाक्यावर लावलेले प्लॅस्टिकचे बॅरिकेट्स फेकून देण्यास सुरुवात केली. ते पाहून अन्य महिलांनी तेच सुरू केले. टोलनाक्यावरील बॅरिकेट्स फेकली गेली होती. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक प्रदीर्घ काळ थांबली होती. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीने करवीर पोलिसांना दखलपात्र गुन्हा दाखल का केला नाही याची विचारणा केली. पोलिसांनी टोलचालकांच्या बाजूने न बोलता जनतेची बाजू घ्यावी, असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले.