शहरात सीरियल किलर खून प्रकरणाची धास्ती असताना बुधवारी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. डोक्यात घाव घालून हा खून करण्यात आल्याचे दिसून आहे. या महिलेची ओळख पटली असून शंकुतला महादेव जाधव (वय ६५) असे तिचे नाव आहे. या प्रकारातील हा ११ वा बळी आहे. शहरात पोलिसांची कडक गस्त सुरू असतानाही आणखी एक खून झाल्याने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली आहे.     
लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉल शेजारी एका जुन्या दुकानाजवळ महिलेचा मृतदेह पडल्याचे बुधवारी सकाळी तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला असल्याने नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. डोक्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. ही माहिती नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली.     
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक व्ही.टी.पवार, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या पथकाने फोर्ड कॉर्नपर्यंत मार्ग काढला. यामुळे तपासाला मर्यादा आल्या. मृत महिलेच्या हातामध्ये एक चिठ्ठी आढळली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा तो केसपेपर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याआधारे पोलिसांनी महिलेचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. शाहूपुरीतील कुंभार गल्ली येथे राहणारी शंकुतला जाधव नावाची ही महिला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. या महिलेला पक्षाघात झाला होता. त्यासाठी ती इस्पितळात उपचार घेत होती. २३ मे रोजी तिने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार घेतले असल्याचे केसपेपरमधून दिसून आले. ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.    
शहरातील सीरियल किलरमधील हा अकरावा खून आहे. तर गेल्या पंधरवडय़ातील हा चौथा खून आहे. आतापर्यंत पुरुषांचे खून झाले होते. महिलेचा खून होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या खून प्रकरणाचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक विजापूर, हुबळी, धारवाड, मिरज आदी ठिकाणी पोहचले आहे. शिवाय शहरातही नाकाबंदी करण्यात आली आहे. गस्ती पथकातही वाढ करण्यात आली आहे. इतकी सारी दक्षता घेऊनही मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा खून झाल्याने शहर हादरले आहे.
विशेष पथकाकरवी चौकशी
शहरातील सीरियल किलर प्रकाराच्या खून प्रकरणाची नोंद राज्य प्रशासनाने घेतली आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पंधरा दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा तपास गुप्तचर खात्याकडे सोपवावा अशी मागणी केली होती. या मागणीची पोलीस प्रशासनाने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.