चितळे रस्त्यावरील पाडलेल्या नेहरू मंडईच्या जागेवर नव्याने मंडई व व्यापारी संकुल बांधण्यासाठी पुन्हा निविदा काढण्याच्या सूचना महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी दिल्या.
जगताप यांनी बुधवारी या जागेची पाहणी केली. या वेळी त्यांनी वरीलप्रमाणे सूचना दिल्या. महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर सुवर्णा कोतकर, स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, अतिर्कित आयुक्त विलास वालगुडे, नगरसेवक श्रीपाद छिंदम, दीपक सूळ, संजय झिंजे या वेळी उपस्थित होते.
चितळे रस्त्यावरील जुन्या नेहरू भाजी मंडईची इमारत पाच वर्षांपूर्वी मनपाने पाडली. येथे नव्याने भाजी मंडई व व्यापारी संकुल बांधण्यासाठी ही जुनी इमारत पाडण्यात आली, मात्र गेल्या पाच वर्षांत हे काम रेंगाळले आहे. मनपाने खासगीकरणातून हे काम करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याची निविदा काढूनही विकसकांचा प्रतिसाद न मिळाल्याने हे काम रेंगाळले आहे. स्वनिधीतून हे काम करण्यासारखी मनपाची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळेच बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर हे संकुल बांधण्याचा मनपाचा प्रयत्न होता. तातडीने हे संकुल बांधावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार आंदोलनेही केली.
जगताप यांनी बुधवारी या जागेची पाहणी केल्यानंतर पुन्हा निविदा काढण्याची सूचना प्रशासनाला केली. मंडईची जुनी इमारत पाडल्यानंतर येथील भाजीविक्रेते या व अन्य रस्त्यावर बसू लागले असून त्याचा रहदारीला मोठा अडथळा होतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या सगळय़ा गोष्टी लक्षात घेऊन तातडीने निविदा काढून हे संकुल मार्गी लावावे, असे जगताप यांनी सांगितले.
मनोरा हवाच!
नेहरू मंडईचा आकर्षक मनोरा ही शहराची ओळख होती. त्यावर घडय़ाळही होते. काळाच्या ओघात हे घडय़ाळ बंद पडले. पहाटे व रात्री त्यावर वाजवली जाणारी सनई बंद पडली, तरीही हा मनोरा ही या परिसरासह शहराची ओळख होती. त्याच्याशी नगरकरांचे असलेले भावनिक नाते लक्षात घेऊन नव्या इमारतीत मनोरा कायम ठेवावा अशी अनेकांची मागणी आहे.