‘शरियत मेरी जान है’ अशी उर्दू भाषेतील पट्टी कपाळावर बांधलेली. ‘हुकूमत अपना काम करे इस्लाम को ना बदनाम करे. इस्लाम का जो दस्तुर है, वह हमको मंजूर है.तलाक बिल एक सजीश है.’ असे विविध फलक हातात घेऊन मुस्लिम महिला ट्रिपल तलाक बिला विरोधात औरंगाबाद शहरातील आमखास मैदानात जमल्या होत्या. मुस्लीम समाजाच्या ‘शरियत’मध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत त्यांनी त्या विरोधात आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा मोर्चा काढण्यात आला होता. ट्रिपल तलाक विरोधात करण्यात आलेला हा कायदा शरियत मध्ये ढवळा ढवळ आहे.शरियत आमची ओळख असून त्यासाठी आम्ही जीव देखील द्यायला तयार आहोत. शरियतचा जो नियम आहे. तो आम्हाला मान्य आहे. सरकारला मुस्लिम समाजासाठी खरोखरच काही करायचं असेल तर शिक्षण, आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. असं मत यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी व्यक्त केलं.

मोर्चासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती. वॉर्डनिहाय बैठका, प्रत्येक घरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यात आली. त्यामुळे आज हजारोंच्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी मुस्लिम समाजातील तरुणांकडून वाहतूक सुरळीत करणे, महिलांना रांगेत चालायला लावणे तसेच मोर्चात सहभागी महिलांना पाण्याची व्यवस्था केली गेली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Against triple talaq bill march in aurangabad
First published on: 23-03-2018 at 18:36 IST