उरमोडी योजनेच्या पाण्यासंदर्भात खटाव-माण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने यासंर्भात गांभीर्याने लक्ष द्यावे, असा इशारा हरणाई सूतगिरणीचे संस्थापक, युवानेते रणजितसिंह देशमुख यांनी दिला.
उरमोडी योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर देशमुख यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार व कोंबडवाडी येथील पंप हाऊसची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब गायकवाड, महेश पवार, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, की २००४ साली पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत कातरखटाव येथील चारा छावणीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपण पाचारण केले होते त्यावेळी त्यांनी उरमोडी योजनेच्या कामासाठी ३० कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यातूनच कोंबडवाडी येथील टप्पा क्रमांक २ चे काम मार्गी लागले आहे. मात्र, त्यानंतर या कामास म्हणावी तशी गती आली नाही. ३ वर्षांपूर्वी या कामांना गती यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र राहिल्याने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
पाण्यासाठी शेतकरी पाटबंधारे विभागाकडे टाहो फोडत आहेत. मात्र, २ महिने झाले तरी पुसेसावळी परिसरातून पुढे पाणी सरकत नाही. राजकीय धनदांडग्यांपुढे जर प्रशासन हतबल असेल तर लोकांना कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा. अन्यथा तोडफोड आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकेल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.