जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अलीकडेच कारभार स्वीकारणारे महेश घुर्ये यांच्या विरोधात कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी बंड पुकारले असून घुर्ये हे कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक न देता दहशत बसवीत असल्याचा आरोप करत ३७ कर्मचाऱ्यांनी थेट खात्यातील वरिष्ठांना साकडे घातले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेची धमकी देत कार्यालयातील वाद चव्हाटय़ावर आणले आहेत.
अवघ्या महिन्याभरापूर्वी पोलीस अधीक्षकपदाचा कारभार हाती घेऊन जिल्ह्य़ातील अवैध धंद्यांना आळा घालू पाहणारे महेश घुर्ये यांना त्यांच्याच कार्यालयातून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे तास निश्चित असताना घुर्ये वेळेचे कोणतेही बंधन न पाळता कर्मचाऱ्यांना अतिशय अयोग्य प्रकारची वागणूक देत असल्याचा आरोप कार्यालयीन कर्मचारी संघटनेने केला आहे. महिला कर्मचाऱ्यांशीही अशोभनीय वागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे आपली व्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींसमोर मांडली आहे. घुर्ये यांच्या दहशत आणि मनमनी कारभारामुळे सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडली असून त्यामुळे होणाऱ्या परिणामास घुर्येच जबाबदार राहणार असल्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. तक्रारींचे निरसण न झाल्यास सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत सामूहिक रजेचे हत्यार उपसण्याचा निर्णयही घेतला आहे.
दुसरीकडे घुर्ये यांच्या विरोधात त्यांच्याच खात्यातील काही अधिकाऱ्यांनी षड्यंत्र रचून या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घुर्ये यांना अडचणीत आणल्याचीही चर्चा रंगली आहे. मुळातच काही वरिष्ठ अधिकारी घुर्येच्या कामकाजामुळे पुरते हैराण झाले आहेत. त्यामुळेच कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या माध्यमातून घुर्येविरोधात त्यांनीच निशाणा साधल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकाराबद्दल एकही अधिकारी मात्र बोलण्यास तयार नाही. या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस दलातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले आहेत.