उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरली, रायगड जिल्ह्य़ात ठिकठिकाणी निदर्शन करून त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अलिबागमध्ये अजित पवारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुष्काळग्रस्ताच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अजित पवारांच्या निषेधासाठी आज ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. राज्य सरकारच्या संवेदना बोथट झाल्या असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. महाडमधील शिवाजी चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केले. तर अलिबागमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियासमोरील चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या वेळी अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. दुष्काळग्रस्तांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सेनेचे तालुका अध्यक्ष हेमंत पाटील, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि शहरप्रमुख कमलेश खरवले या वेळी उपस्थित होते.