हिंगोली,नांदेडला बसवर दगडफेक; आमदार मेटेंच्या भाषणादरम्यान गोंधळ

वार्ताहर, हिंगोली/नांदेड/बीड

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग सुरूच असून रविवारी हिंगोली जिल्ह्य़ात एका तर नांदेडमध्ये तीन ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. तर परळीत आंदोलकांनी पत्रकार बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नसून त्यांना रोखण्यासाठी पंढरपुरात आमची एक फौज राहणारच असल्याची भूमिका जाहीर केली.

हिंगोली जिल्ह्य़ात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. शनिवारी जिल्ह्णात दोन ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशीही या आंदोलनाची धग कायम असून, रविवारी डोंगरकडा बसस्टॉपवर हदगाव आगाराच्या बसवर अज्ञातांनी दगडांचा वर्षांव करून बसची तोडफोड केल्याची घटना घडली.

या घटनेविषयी पांडुरंग मुरमुरे या बस चालकाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पप्या नावाच्या व्यक्तीसह तिघांनी संगणमत करून रविवारी दुपारी हातात दगड व लाकडे घेऊन बसच्या काचा फोडल्या व ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत दहशत निर्माण केल्याच्या आरोपाखाली आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनकर्त्यांना एकप्रकारे पाठिंबाच दिल्याचे चित्र होते. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन पोलीस ठाण्यात दिले. भाजपा सरकार आरक्षण देत नसल्यामुळे सरकारचा निषेध निवेदनात व्यक्त केला.

नांदेडमध्ये तीन बसवर दगडफेक

नांदेड – राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. नांदेड जिल्ह्य़ातही हे आंदोलन पेटले असून आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्य़ात तीन बसेस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.

बीड जिल्ह्य़ातील परळी येथून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर नांदेड जिल्ह्य़ातही मराठा समाजाचे आंदोलनकत्रे रस्त्यावर उतरले असून त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे.

शनिवारी सायंकाळी नांदेड आगाराची नांदेड-िहगोली जाणारी बस अर्धापूर शिवारात पंक्चर झाल्याने थांबली असता आंदोलनकर्त्यांनी या बसच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी मिर्झा आदील बेग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत शहराशेजारील पुयडवाडी पाटीजवळ उमरी-नांदेड बस ही नांदेडकडे येत असताना कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चालक केरबा जमदाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

चर्चा करायची असेल तर परळीत या

आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा पत्रकार बठकीत करण्यात आली. राज्यभरातून आंदोलनाला मोठा प्रतिसाद भेटत असून भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होईल याची नोंद घेऊन जे घडेल त्याची जबाबदारी सरकारवरच असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकरभरतीचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन संपणार नाही. सरकारच्या शिष्टमंडळाला आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी परळीत येऊन करावी असेही आंदोलकांनी सांगितले.

आमदार मेटेंच्या भाषणात गोंधळ

परळी येथे ठोक मोर्चानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडलेला आहे. शनिवारी रात्री उशिरा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आमदार मेटे यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शनही केले. मात्र भाषण अंतिम टप्प्यात असताना उपस्थित काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांना रोखले. राजीनाम्याच्या मागणीवरूनही आमदार मेटेंची कोंडी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी कडे करून आ.मेटे यांना सुरक्षित गाडीपर्यंत आणले.

मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही; पंढरपुरात फौज राहणार

आंदोलकांची भूमिका

बीड- राज्यात ५८ आंदोलने होऊनही शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने असून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी महापूजेला जाणार नसल्याचे सांगितले असले तरी त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. ते पंढरपुरात गेले तरी त्यांना रोखण्यासाठी मोठी फौज उभी असल्याची भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने परळीत रविवारी घेतलेल्या पत्रकार बठकीत स्पष्ट केली. नोकरभरतीवरील स्थगिती आणि आरक्षणाचा निर्णय    होईपर्यंत माघार नाहीच. असे ठणकावून सांगत मराठा समाजाची पुढील दिशा परळीतूनच ठरणार असल्याचे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.