महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी  मंदिरे सुरु करा, या मागणीसाठी आज आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर  कोल्हापूर येथे देखील  या मागणीसाठी ‘दार उघड उद्धवा दार उघड’, ‘दारू नको भक्तीचे दार उघड’ अशा घोषणा देत घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यभर होणाऱ्या या आंदोलनाला भाजपाने पाठिंबा दर्शवला आहे.

कोल्हापूर शहरामध्ये हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील प्रमुख दहा मंदिरांच्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.  भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

आणखी वाचा- उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार… म्हणत मंदिरं उघडण्यासाठी पुण्यात भाजपाचे आंदोलन

‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, उघडले मॉल्स, उघडली मद्यालये मुख्यमंत्रीजी कधी उघडताय आमची देवालये ? केंद्र सरकारचा नियमावली सहा आदेश कुंभकर्णी शासन देईना ना संदेश….  टाळ, मृदुंग, घंटानाद यांच्या निनादात वरील घोषणा देण्यात आल्या. घोषणांचे फलक घेऊन  राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आणखी वाचा- ‘दार उघड उध्दवा दार उघड’, मंदीरांसाठी भाजपाचे शिर्डीत आंदोलन

महालक्ष्मी मंदिरासमोर असलेल्या महाद्वार चौकात  घंटानाद आंदोलनाप्रसंगी  जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, “केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. परंतु राज्यातील या तिघाडी सरकारमध्ये निर्णयांची एकवाक्यता नसल्यामुळे मंदिरे अद्यापही बंद ठेवून एक प्रकारे भाविकांची अडवणूक करत आहेत. धार्मिक स्थळे सुरू झाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा व आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मन:शांती लाभणार आहे. दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन महसूल गोळा करण्याच्या पाठी मागे लागलेल्या या सरकारला भक्तांच्या श्रद्धेकडे पाहण्यासाठी वेळ नाही.”