बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांभोवतीचा कारवाईचा फास आवळला जाऊ लागल्यानंतर भुजबळांच्या समर्थकांनी मंगळवारी नाशिक शहरासह, निफाड, येवला, विंचूरमध्ये निदर्शने केली. नाशिक शहरात निदर्शने करीत रास्तारोको करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत ताब्यात घेतले. दुपारनंतर शहरातील कॉलेज रस्ता आणि पंचवटी उड्डाणपूलावर एसटी महामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेकही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांचा शोधही घेण्यात येतो आहे.
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना सोमवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अटकेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये भुजबळ समर्थकांनी आणि महात्मा फुले समता परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्येही स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नाशिक शहरामध्ये रास्तारोको करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी भुजबळांविरोधातील कारवाईचा निषेध केला आहे.