20 November 2017

News Flash

समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आंदोलन

पिण्याच्या पाण्याची समस्या.. विजेची समस्या.. अस्वच्छतेची समस्या.. आंघोळीसाठी पाटापर्यंत भटकंती.. अशा सर्व समस्यांचा डोंगर

प्रतिनिधी, नाशिक | Updated: February 11, 2013 3:24 AM

पिण्याच्या पाण्याची समस्या.. विजेची समस्या.. अस्वच्छतेची समस्या.. आंघोळीसाठी पाटापर्यंत भटकंती.. अशा सर्व समस्यांचा डोंगर उभा राहूनही त्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ रविवारी शहराजवळील आडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात आंदोलन करण्यात आले. दुपारनंतर अधिकाऱ्यांनी दखल घेत सर्व समस्या दहा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत शहरातील द्वारका परिसरात असलेले विभागीय स्तरावरील हे विद्यार्थी वसतिगृह सुमारे सात महिन्यांपूर्वी आडगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले. शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर नवीन इमारत असल्याने प्रारंभी विद्यार्थी तेथे येण्यास राजी नव्हते. त्या वेळी त्यांना सर्व सुविधा देण्याचे आश्वासन विभागाच्या वतीने देण्यात आले होते; परंतु नवीन इमारतीत विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे त्यांना जाणवू लागले. वसतिगृहात अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी उपस्थित राहत नसल्याने अचानक काही घडल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही विद्यार्थ्यांना पडतो.
अलीकडे तर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची तसेच आंघोळीच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. काही विद्यार्थी इमारतीपासून दोन-तीन किलोमीटरवर असलेल्या पाटाच्या पाण्यात आंघोळीसाठी जातात. यापेक्षाही महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे इमारतीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. काही दिवसांपासून तर रात्रीचा वीजपुरवठा बंद आहे. विद्यार्थ्यांजवळील मेणबत्त्याही संपुष्टात आल्याने अभ्यास करावा तरी कसा, अशी समस्या दीपक गोरे या विद्यार्थ्यांने ‘लोकसत्ता’कडे मांडली. इमारतीत सर्वत्र अस्वच्छता असून कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी विद्यार्थ्यांनी सकाळपासून उपोषण सुरू केले. दुपारी या समस्यांच्या निषेधार्थ पुतळा दहन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत विद्यार्थ्यांची समजूत काढली. पुढील दहा दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी गृहपाल रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. या आंदोलनात दीपक गोरे, मनोज अहिरे, सूरज पूरकर, ज्ञानेश्वर बांगर, योगेश पाटील, सचिन गरुड, अंकुश पवार यांसह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

First Published on February 11, 2013 3:24 am

Web Title: agitation of backward student hostel for attention of problem