मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करण्यात यावा आणि समाजाला पूर्वीच्या सरकारने जाहीर केलेले आरक्षण सर्व क्षेत्रात कायम ठेवावे, या मागणीसाठी शिवसंग्राम अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. तब्बल तासभर टॉवरवर चढून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आणि तहसीलदारांनी विनवण्या करून खाली उतरविले. गेल्या आठवडाभरापासून शिवसंग्राम संघटनेचे कार्यकत्रे मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
 बीड जिल्ह्यात मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाने वेग घेतला आहे. सोमवारी शिवसंग्रामचे कार्यकत्रे खय्युम इनामदार, अमरशेख, जगन्नाथ भोसले व अन्य दोन असे पाचजण गांधीनगर परिसरात असलेल्या मोबाईलच्या टॉवरवर चढून बसले. मुस्लिम समाजाचा शैक्षणिक, आíथक व राजकीय परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वारंवार समित्या गठित केल्या. विविध तज्ज्ञांचे आयोग स्थापन केले. या सर्व समित्यांनी आणि आयोगांनी मुस्लिम समाजाला आरक्षणाची किती गरज आहे, हे आपल्या अहवालातून सरकारपुढे मांडले. त्याच अनुषंगाने आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण लागू केले होते. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे हे आरक्षण रद्द झाले. केवळ शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी ज्याप्रमाणे राज्य सरकारने स्वतंत्र कायदा केला त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणासाठीही कायदा करून पूर्वीप्रमाणे सर्व क्षेत्रात आरक्षण लागू करावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. कार्यकत्रे टॉवरवर चढून बसल्याची माहिती पोलीस आणि तहसील प्रशासनाला झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विनवण्या केल्या. तब्बल तासभरानंतर आंदोलनकत्रे टॉवरवरून खाली उतरले.