लवादावर भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांची निवड करावी, ऊसतोडणी यंत्राप्रमाणे मजुरी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हय़ात तेरा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संप पुकारुनही साखर संघ व शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ऊसतोडणी मजूर रस्त्यावर आले. मागण्या मान्य झाल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.         
बीड जिल्हय़ात सोमवारी ऊसतोडणी कामगार, मजूर व बलगाडीवाहक संघटनाचे वतीने तेरा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. वडवणीत माजी आ. केशवराव आंधळे यांनी मजुरांनी मागण्या मान्य होईपर्यंत कोयता हातात घेवू नये, असे आवाहन केले. तर धारुरमध्ये दत्तोबा भांगे आणि पाटोद्यात विष्णूपंत जायभाये यांच्या नेतृत्वाखाली रस्ते रोखण्यात आले. साखर संघाचे प्रतिनिधी आणि ऊसतोडणी मजुरांचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लवादाने केलेला करार यावर्षी संपला असून नव्याने करार, ऊसतोडणी यंत्राप्रमाणे कामगारांना मजुरी द्यावी, या मागणीसाठी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. १५ ऑक्टोंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. तरी ऊसतोडणी मजूर गावातच आहे. कोयता बंद आंदोलन सुरू करूनही साखर संघ व सरकार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या संघटनांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करत आक्रमक पावित्रा घेतला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे लवादावर आ. पंकजा मुंडे यांना घ्यावे व करार करून संप मिटवावा. अन्यथा आंदोलन तीव्र होईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. जिल्हय़ात जवळपास सहा लाख ऊसतोड मजूर असून मराठवाडय़ात ही संख्या साडेबारा लाख आहे. सिरसाळा, माजलगांव, ढेकणमोहा, अंबाजोगाई, दादा हरी वडगांव, मांजरसुंबा, वडवणी, केज, जातेगांव, उमापूर आदी ठिकाणी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकत्रे आणि ऊसतोड कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले.
आ. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष
ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर प्रत्येक वेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला. युतीच्या काळात उपमुख्यमंत्री असतांना गोपीनाथ मुंडे यांनी ”खुर्ची गेली तरी चालेल परंतु ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे”, अशी भूमिका घेवून मजुरांना न्याय मिळवून दिला होता. आज मुंडे यांच्या वारस आ. पंकजा मुंडे ऊसतोड मजुरांच्या संपाप्रश्नी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.