प्रवेश प्रक्रियाच लांबल्याने शैक्षणिक नियोजन अडचणीत

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकालाचा घोळ चच्रेत असतानाच आता कृषी अभ्यासक्रम प्रवेशाच्या गोंधळाने राज्यातील शैक्षणिक अराजकतेत भर टाकली आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया आणि कृषी महाविद्यालयांचे वर्ग दोन आठवडे पुढे ढकलण्याची नामुष्की ‘एमसीएआर’वर आली आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत कृषी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी राज्यातील महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद अर्थात एमसीएआरने अन्न व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे यंदा अचानक प्रवेश निकष बदलल्याने एका अपात्र ठरलेल्या विद्यार्थिनीने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे साहजिकच न्यायालयाच्या आदेशाने प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली. यापूर्वीही एमसीएआरचे निकष बदलाचे धोरण कृषी विद्यापीठाच्या संचालक निवड प्रक्रियेला अडसर ठरले होते. मुळात भारतीय कृषी अनुसंधान परिषद अर्थात आयसीएआरने यंदा अन्न व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे निकष बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यात बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राबरोबरच गणित विषयही अनिवार्य केला. या त्रुटीने विद्यापीठांची अधिस्वीकृती धोक्यात येण्याच्या भीतीने एमसीएआरनेही राज्यभरातील कृषी विद्यापीठांच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत त्याची तातडीने अंमलबजावणी केली. या निर्णयामुळे अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमापासून दूर राहावे लागले. मात्र एका विद्याíथनीच्या तक्रारीनंतर तिला गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये नव्याने बदल करणे अपेक्षित होते. ही सुधारणा झाल्यानंतर काल एमसीएआरने तातडीने या नवीन वेळापत्रकाची घोषणा केली.

राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत विविध कृषी अभ्यासक्रमाच्या एकूण १५ हजार २६७ जागा असून त्यासाठी यंदा तब्बल ५५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. एमसीएआरने यापूर्वी २७ जुलला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून १९ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यात कृषी अभ्यासक्रमाचे वर्ग १० जुलला सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

  • दर वर्षी याच कालावधीत कृषी अभ्यासक्रमाची सुरुवात होत असल्याने महाविद्यालयांचे वार्षकि शैक्षणिक नियोजन त्यानुसारच ठरवले जाते. पण आधीचे वेळापत्रक रद्द झाल्याने कृषी शिक्षणाचे तीन तेरा वाजण्याचे संकेत मिळाले आहेत.
  • आता एमसीएआरच्या नवीन निर्णयानुसार ही प्रवेश प्रक्रिया ७ ते ३१ ऑगस्टदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिली प्रवेश यादी १० ऑगस्टला प्रसिद्ध होणार असून १६ आणि २२ तारखेला अनुक्रमे दुसरी आणि तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार २८ ऑगस्टपासून नवीन वर्ग सुरू करण्यात येणार असले तरी हा गणेशोत्सवाचा काळ असल्याने कृषी महाविद्यालयाचे पदवीच्या पहिल्या वर्षांचे वर्ग प्रत्यक्षात सप्टेंबरमध्येच सुरू होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
  • प्रवेशाच्या अशा विलंबामुळे राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या वार्षकि शैक्षणिक नियोजनावर गंभीर परिणाम होणार आहेत. एमसीएआरच्या धोरणामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यंदा कृषी महाविद्यालयांना स्वतंत्र निर्णय घ्यावे लागणार आहेत.