प्रबोध देशपांडे

विदर्भातील संपूर्ण ११ जिल्हय़ांचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २१ विदेशी विद्यार्थी कृषी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधून गत ५० वर्षांत ४८ हजार कृषी पदवीधर तयार झाले आहेत. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तारात विद्यापीठाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.

विदर्भाला शेतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु गत दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांची काळी छाया विदर्भातील कृषी क्षेत्रावर पडली आहे. या परिस्थितीतही  कृषी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा कल सातत्याने वाढत आहे.  २० ऑक्टोबर १९६९ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठांतर्गत १० घटक महाविद्यालये, दोन संलग्न महाविद्यालये व २६ कायम विना अनुदानीत खासगी कृषी महाविद्यालये असून या मार्फत दरवर्षी एकूण ३६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी ३१९५, पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या ४१० व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या ५६ जागांचा समावेश आहे.

‘इंडो-अफगाण, इंडो-अफ्रिका व इंडिया-नेपाळ शिष्यवृत्ती मदत निधी’ या नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत प्रकल्पांतर्गत अफगाणिस्तान, नेपाळ, इथियोपीया, नायजेरीया, युगांडा, इजिप्त, व्हिएतनाम व भुतान या देशांमधील २१ विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४८१९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ३७८८३ पदवीधर, ९५९७ पदव्युत्तर व ७१० आचार्य पदवीधर समाविष्ट आहेत.

नव्यानेच दोन महाविद्यालयांची स्थापना

विदर्भासाठी नव्यानेच दोन महाविद्यालये मंजूर झाली आहेत. त्यामध्ये ४० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले यवतमाळ येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले चंद्रपूर जिल्ह्यतील मुल मारोडा येथे कृषी महाविद्यालय आहे.

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षण देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांनाही कृषी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

– डॉ. विलास भाले, कुलगुरू.