शेतमजूर आणि कोरडवाहू शेतकरी हे कृषीधोरणाच्या केंद्रस्थानी असणे ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर प्रयोगशीलता दाखवली आणि विज्ञानाची कास धरली तर शेती फायदेशीर ठरते हे छोटय़ा शेतकऱ्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे..बदलत्या काळातील अर्थकारणाला तोंड द्यायचे तर छोटय़ा शेतकऱ्यांना सहकारी शेतीची कास धरावी लागेल, असा कानमंत्र कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मंगळवारी ‘शेती आणि प्रगती’ या चर्चासत्राच्या समारोपात दिला.
‘लोकसत्ता’ व ‘सारस्वत बँके’तर्फे होणाऱ्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सोमवारपासून सुरू झालेल्या ‘शेती आणि प्रगती’ या दोन दिवसीय चर्चासत्राचा समारोप मंगळवारी झाला. कृषी व सहकारातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्यासह माजी सनदी अधिकारी आणि कृषीक्षेत्रातील जाणकार उमेशचंद्र सरंगी, कृषीअर्थशास्त्राचे तज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांच्यासह पाणीक्षेत्रातील तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांनी        आपले अनुभव सांगत शेतीच्या बदलत्या स्वरूपाचे चित्र मांडले आणि त्यावरील उपाययोजनांची चर्चा केली. खासगी कंपन्यांचे आव्हान पेलायचे तर छोटय़ा शेतकऱ्यांना ‘सहकारी शेती’ हाच मार्ग असल्याचा सल्ला बाळासाहेब विखे पाटील यांनी दिला.
शेतीचे अर्थकारण किफायतशीर होण्यासाठी शेतमजूर शेतकरी ते उद्योजक शेतकरी हा बदल होण्याची गरज, मिलिंद मुरुगकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पाणलोट, अन्न सुरक्षा आणि रोजगार हमी योजनेत शेतीचे अर्थकारण बदलण्याची व शेतकऱ्याला सक्षम करण्याची प्रचंड क्षमता असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
पीकपद्धतीमधील विविधता हे महाराष्ट्रातील शेतीचे वैशिष्टय़ असून शेतीमधील बदलांचा वेध घेण्यातही महाराष्ट्राचे शेतकरी कायम आघाडीवर असतात, असे उमेशचंद्र सरंगी यांनी नमूद केले. तसेच शेतीमधून चांगले उत्पन्न घेण्यातही महाराष्ट्राचे शेतकरी मागे नाहीत. १९९० मध्ये सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन एक लाख टन होते.  तर, २०१३ मध्ये हेच प्रमाण ३५ लाख टनांवर गेले; हा सकारात्मक बदल आहे. सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
उसाचे सरासरी एकरी उत्पादन सध्या २७ टन आहे, ते १५० टनापर्यंत जाऊ शकते हे काही शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. तसे झाल्यास राज्यात ऊस शेतीसाठी सध्याच्या तुलनेत एक तृतीयांश क्षेत्रच लागेल व पाण्याचीही मोठी बचत होईल, असे प्रतिपादन ऊसशेतीमधील तज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी केले.

*‘मुंठापुराना’ हे राज्याच्या पाण्याचे शोषण करत आहेत. मुंठापुराना म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि नाशिक!
– अरुण देशपांडे
* उद्योगक्षेत्राच्या तुलनेत पाण्याची कमी गरज असलेल्या सेवाक्षेत्राने ग्रामीण भागाकडे वळावे म्हणजे रोजगारनिर्मितीही होईल व पाण्याचीही बचत होईल!
– दि. मा. मोरे
* आपले भले कशात आहे हेही शेतक ऱ्यांना समजेनासे झाले आहे, ही शोकांतिका आहे
-बाळासाहेब विखे पाटील