चौकुळ गावात अतिवृष्टी व थंडीमुळे कृषी उत्पादनांना संधी नसल्याचे सांगितले जात असतानाच गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी कृषीक्रांती घडविण्यासाठी पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. अरुण गावडे या शेतकऱ्याने सिमला मिरचीची लागवड यशस्वी करून दाखवत स्थानिक बाजारपेठेत मार्केट मिळविले आहे. चौकुळ गावात स्ट्रॉबेरी, बटाटे, सूर्यफूल व आता सिमला मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे.
अतिवृष्टी व थंडीमुळे शेतीला चौकुळ गाव योग्य नसल्याची ओळख पुसून काढून दुग्धउत्पादनात कृषीक्रांती घडविण्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे कृषी पर्यटनासही वाव मिळेल, असे बोलले जात आहे.
सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती अरुण गावडे यांनी सिमला मिरचीचा प्रयोग यशस्वी केला. सेंद्रीय खताचा वापर करून हे उत्पादन घेतल्याने पाणीवापरही कमी प्रमाणात करावा लागला, असे ते म्हणाले.
चौकुळमध्ये गेली तीन-चार वर्षे शेती विषयक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कोकण व घाटमाथा यापेक्षा येथे थोडेसे वेगळे हवामान आहे. त्याचा परिणाम शेतीवर होतो. या ठिकाणी सर्रास पारंपरिक भातशेती व नाचणीसारखे नागली पीक घेतले जाते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून स्थानिकांनी कृषी विभागाच्या मदतीने व्यावसायिक शेतीला प्रारंभ केला आहे. त्याला बऱ्यापैकी यश मिळत आहे.
स्ट्रॉबेरीची शेती दोन वर्षांपूर्वी यशस्वी झाली, त्यानंतर स्ट्रॉबेरी लागवड वाढली. त्यानंतर अरुण गावडे यांनी गतवर्षी बटाटय़ाची लावगड करून उत्पादन घेतले. यंदा गावडे यांनी मैना, सीतारा, इंडस व इंद्रायणी या जातीच्या सिमला व नेहमीच्या तिखट मिरचीची लागवड केली. दोन गुंठय़ावरील हा प्रयोग यशस्वी झाला.
इंटस व इंद्रायणी या भोपळी मिरचीच्या एका झाडापासून पाच किलोपेक्षा जास्त उत्पादन त्यांनी घेतले. हे उत्पादन दोन महिन्यांत मिळविले. त्यासाठी ठिंबक सिंचन पद्धत राबविली.
तालुका कृषी अधिकारी गुरव, पवार, किर्ते, चव्हाण, भोईकर तसेच स्ट्रॉबेरी उत्पादक नाना आवटे यांनी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे व्यावसायिक कृषी उत्पादनावर भर देतील, असे ते म्हणाले.