कृषी म्हणजे समस्यांचे माहेरघर. २००८ ते २०१४ या कालावधीत कर्जमाफीनंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सरकारने अलीकडेच जाहीर केली, तो आकडा ९ हजार ६१४ एवढा होता. हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे गुणीजनांचे या क्षेत्राकडे आकर्षण कमालीचे वाढलेले आहे. राज्यातील १७३ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास इच्छुकांचे तब्बल ६२ हजार अर्ज आले आणि पहिल्या फेरीचे प्रवेश थांबले थेट ९४ टक्क्यांवर. गुणवंत विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे गेलेला हा कल भुवया उंचावायला लावणारा आहे.
कृषी क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा हा ओढा प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांचा नाही, हे वास्तव आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हाच आलेख कायम आहे. दुसरीकडे अभियांत्रिकी क्षेत्रात या वर्षी तब्बल ६० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाख ६० हजार आहे. प्रवेशाची आणखी एक फेरी करण्यास मान्यता मिळाली असली तरी या वर्षी अधिक जागा रिक्त राहतील, अशी शक्यता उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संबंधित १७३ महाविद्यालयांपकी ३१ महाविद्यालये शासकीय आहेत. २ महाविद्यालये संलग्नित आहेत, तर १४३ महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून पहिल्या फेरीअखेर ९४ टक्के गुण असणाऱ्यांनाच प्रवेश मिळू शकला. प्रवेशासाठीचा शेवटचा टक्का फार तर ८७ टक्क्यांवर थांबू शकतो, असे या तज्ज्ञांचे मत आहे. कृषी पदवी मिळविण्यासाठी सातबारा उतारा जोडल्यानंतर १२ टक्के वाढतात. हा आकडा जरी वजा केला तरी गुणांमध्ये वरचढ असणारा विद्यार्थी कृषी क्षेत्रात प्रवेश घेत आहे.

सातबारा जोडल्यानंतर गुणांमध्ये होणारी वाढ हे जरी एक कारण असले, तरी कृषीकडे चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचे कारण या विषयात अनेक बाबींचा समावेश होतो. मातीचे शास्त्र, सिंचन, अर्थशास्त्र, अन्न प्रक्रिया, फलोत्पादन यांसह अनेक क्षेत्रे खुली होतात. विशेषत: एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा फायदा होतो.
– डॉ. राम खच्रे, उपाध्यक्ष,
राज्य कृषी परिषद

कृषी क्षेत्रात पदवी घेणाऱ्यांचा शेती सुधारणेत वाटा मोठा आहे. खते, बियाणे, अवजारे याच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान आहे. तसेच उत्पादित मालाची बाजारपेठ आणि बँकिंग क्षेत्रातही आता मोठा वाव असल्याने कृषी पदवीकडे अनेक जण वळत आहेत, असे दिसते.
– डॉ. उमाकांत दांगट,
विभागीय आयुक्त तथा माजी कृषी संचालक