यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे आणि खत उपलब्ध करून देण्याची योजना कृषी विभागाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी समूह गटांनी एकत्रित मागणी केल्यास शेतकऱ्यांनी ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे अशी माहिती रायगडचे कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांनी आता वेग आला आहे. कृषी विभागानेही यासाठी शासनस्तरावर तयारीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खतपुरवठा करण्याची योजना कृषी विभागाने तयार केली आहे. शेतकरी समूह गटाने एकत्रित मागणी केल्यास थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत आणि बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाबीज आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बांधावर बियाण्यांचा प्रकल्प राबवला जाणार आहे.
याशिवाय बांधावर गिरिपुष्प लागवड आणि तूर लागवडीसाठी योजना राबवली जाणार आहे. तूर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विपुल जातीचे ५५ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेवगा लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय रायगडच्या कृषी विभागाने घेतला आहे. यात पीकेएम२ या जातीचे बियाणेही शेतकरी समूह गटास पुरवली जाणार आहे. रोपनिर्मिती करून ती बांधावर लागवड केली जाणार आहे, अशी माहिती माने यांनी दिली.
शेतकऱ्यांना पारंपरिक भात पिकाबरोबरच दुसरे पीक घेता यावे यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही या माध्यमातून वाढ होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.