राज्याबाहेरील आवक घटल्याने कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जून महिन्यात भाताची १५ ते २५ दिवस विलंबाने लागवड झाल्याने भात तयार होण्यास काहीसा उशीर होणार आहे. शिवाय बाजारात भाजीपाल्याला सध्या उठाव नसल्याने तसेच शेतकरी-व्यापारी यांच्यात संवाद व व्यवहार कमी झाल्याने भाजीपाला लागवडीच्या विचार प्रक्रियेला खीळ बसली आहे. परिणामी सध्या भाजीपाल्याच्या बियाण्याला २५ ते ३५ टक्के उठाव कमी असल्याचे दिसून आले आहे. देशात इतरत्र पावसाने थैमान घातले असल्याने आगामी रब्बी हंगामात मिरचीसह अन्य भाजीपाल्याला चांगले दर मिळण्याची शक्यता पाहता बागायतदारांनी भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रित करावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

शेतजमीन रब्बी पिकासाठी उपलब्ध होण्यास काही प्रमाणात विलंब होणार आहे. त्यामुळे भाजीपाल्याची  रोपे तयार करण्यास अजूनही अनेक शेतकऱ्यांनी आरंभ केला नाही. यंदा पाऊस सातत्याने झाला व विशेषत: पालघर, डहाणू व वसई तालुक्यात सरासरीहून अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पावसाळ्यातील वेलवर्गीय भाजीपाल्याची रोपे कुजून मृत पावल्याचे दिसून आले. करोनामुळे बाजारात आलेली मरगळ तसेच भाजीपाला विक्रीसाठी घाऊक बाजारपेठेतील निर्बंध, रेल्वेमधून भाजीपाला वाहतूक करण्यास मज्जाव अशा कारणांमुळे अनेक शेतकरी-बागायतदारांनी भाजीपाल्याची आगामी रब्बी हंगामात लागवड न करण्याचा विचार केला आहे. परिणामी भाजीपाला बियाण्याची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. देशात विशेषत: मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व उत्तर भारतातील भागांमध्ये यंदा जोरदार पाऊस झाल्याने त्या भागात मिरचीवर मोठय़ा प्रमाणात रोग आला आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मिरचीच्या आवकीवर परिणाम होईल, असे गृहीत धरून पालघर आणि डहाणू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात मिरची लागवडीची तयारी सुरू केली आहे.

पिकेल ते विकेल

‘पिकेल ते विकेल’ या राज्य शासनाच्या उपक्रमांर्तगत कृषी विभागाचे अधिकारी ठिकाणे शेतकऱ्यांशी संवाद साधत असून भाजीपाला लागवडीकडे लक्ष वळवण्याकडे प्रयत्नशील आहेत. शिवाय या योजनेअंतर्गत पालघर भागात केळी, मनोर भागात बहाडोली जांभूळ तर सफाळे भागात सेंद्रीय भात व भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने डहाणू तालुक्यात चिकू, मत्स्यशेती व व सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवडीवर विशेष गट स्थापन करून समूह शेती विकसित करून त्यांना पूरक व्यवस्था उभारण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

वेलची केळीवर भर

पालघर भागात सफेद वेलची केळीची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केळी पिकविण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करणे, त्यांच्या वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून देणे, जैविक खतनिर्मितीसाठी श्रेडर उपलब्ध करून देणे तसेच शेतीच्या कामासाठी अगर व ट्रिलर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिरव्या केळीच्या ‘टिशू कल्चर’ वाणाऐवजी सफेद वेलची केळीची रोपे तयार करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.