यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये येथे ‘कृषी प्रदर्शन’आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश राहणार आहे. तीन दिवसीय प्रदर्शनात प्रमुख खत विक्रेते, औषध कंपन्या, ट्रॅक्टर व यंत्रसामग्री उत्पादक, बँक व शेती संबंधित संस्था, बचत गट, नर्सरी उद्योजक तसेच शासकीय विभागांचा समावेश राहणार आहे. संकरित बी-बियाणे, त्यांची रोपे, पिकांवर पडणाऱ्या रोगांसाठी औषधे, उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते-औषधे, शेती विषयक पुस्तके, आधुनिक अवजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रक्रिया उद्योगामध्ये विविध उत्पादनांशी निगडित पूरक माहिती मिळणार आहे. याशिवाय ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, फळबाग व्यवस्थापन आणि आधुनिक सिंचन पद्धती, खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने विद्राव्य खते याबाबत विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.