कृषिप्रधान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी व वन पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या हाती लॅपटॉप देण्याचा निर्णयही जिल्हा परिषदेने घेतला आहे. मंगळवारी सादर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन योजनांसह तब्बल १८ नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थ समितीचे सभापती अभिजित तायशेटे यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यांनी ६२ कोटी १५ लाख रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर केला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वनिधीचा आणि पाणीपुरवठय़ाच्या देखभाल व दुरुस्तनिधीचा सन २०१४ सालचा व सन २०१५-१६ सालचा मूळ अर्थसंकल्प सभागृहाच्या मान्यतेसाठी अर्थसंकल्प सभापती अभिजित तायशेटे यांनी सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा विमल पाटील होत्या.
जिल्हा परिषदेचा सन २०१५-१६ सालचा मूळ अर्थसंकल्प ४३-५५ लाख रुपयांचा होता. त्यामध्ये वाढ होऊन तो ६२ कोटी १५ लाख रुपयांचा झाला. अर्थ खात्याने जिल्हा परिषदेला शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी व ठेवींचे सुयोग्य नियोजन केल्याने सन २०१४-१५ मध्ये निव्वळ व्याजातून तब्बल ११ कोटी २५ लाख रुपयांचे उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळाले. ही रक्कम जिल्हा परिषदेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या सुमारे ३३ टक्के इतके आहे.
अर्थसंकल्पांमध्ये १८ नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी व वन पर्यटन केंद्र उभारण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, अभ्यास दौरा, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गाईड प्रशिक्षण व शासकीय योजनांची माहिती देऊन रोजगारनिर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवावे यासाठी तालुका स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या सहकार्याने व जिल्हा परिषदेचे अंशदान देऊन राजर्षी शाहूमहाराजांच्या कार्याची माहिती देणारे केंद्र उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी, पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मोबाइल व्हॅन, ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी बीएएमएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक, अपंगांना एलईडी बेस सोलर पुरविणे, गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात भौतिक सुविधा पुरविणे, बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुणनियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करणे आदी कामांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या जिल्हा परिषदेकडून वाढलेल्या आशांचे प्रतििबब अर्थसंकल्पामध्ये दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा यादृष्टीने सर्वतोपरी दक्षता घेण्यात आली असल्याचे अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांनी सांगितले.