दुष्काळ मराठवाडय़ाच्या पाचवीला पुजलेला. कोरडवाहूचं क्षेत्र ४३ लाख ३३ हजार. प्रत्येक जिल्हय़ात कोरडवाहू शेतकऱ्यांची दु:खं डोंगराएवढी. आत्महत्यांचा आकडा वाढत जाणारा. पण अशा निराशेच्या वातावरणावर मात करणारे ठरले गंगापूर तालुक्यातील शेतकरी. कोरडवाहूचं गणित पाण्याशिवाय कसं सुटणार? पण पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी उत्तर शोधलं. ओवा, बेबीकॉर्न आणि हुरडा असं कोरडवाहूवरील त्यांनी शोधलेलं उत्तर. खरं तर कोरडवाहू मिशनचं राज्याचं एक मुख्य कार्यालय औरंगाबादला होतं. तेच एवढं कुपोषित होतं की, त्यातून शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही. कृषिमंत्रिपदी राधाकृष्ण विखे पाटील असताना त्यांनी उचललेलं पाऊल नोकरशाहीनं उलटय़ा दिशेनं फिरवलं. पण काही शेतकरी पाय रोवून उभे ठाकतात. त्यापैकीच एक वजनापूरचे भानुदासराव चव्हाण आणि नारायणराव सच्चावाडसारखी मंडळी. वजनापूर, शेकटापूर, सायगाव, गोपाळवाडी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी ओवा हे पीक घेतलं. या पिकाला पाणी तसं लागत नाही. पावसाच्या पाण्यावर पाच महिन्यांत ओवा येतो. ओव्याचा सरासरी दर आहे साडेबारा हजार रुपये क्विंटल. एकरी ४ ते ५ क्विंटल येणाऱ्या ओव्यासाठी खर्च लागतो केवळ साडेतीन ते चार हजार रुपये. भानुदासराव चव्हाणांकडे सहा एकर जमीन. त्यात एका एकरात कापूस आणि पाच एकरात ओवा. नारायणरावांकडे १८ एकर जमीन, त्यातील १४ एकरावर ओवा. मिळणारा भाव ऊस, कापसापेक्षा जास्त. परिणामी या परिसरात १६० एकरात हेच पीक. आता या शेतकऱ्यांचा गट बांधला जात आहे. ओव्याची मागणी असणारा मोठा उद्योग रामदेवबाबांचा. पतंजलीच्या औषधनिर्माणाच्या कामासाठी खूप मोठी मागणी असल्यानं आता त्यांच्या बरोबर थेट करार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अपारंपरिक आणि कमी पाण्याची पिके याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शोधलेलं हे उत्तर कोरडवाहूचं गणित सोडविणारं!

गंगापूरपासून कणकोरी दहा किलोमीटरवरचं गाव. एकदा शेतकरी आमदारांना भेटायला गेलेले. तेथे त्यांची दिलीप मोटेंशी गाठ पडली. मोटे हे कृषीच्या आत्मा योजनेतील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक. ते म्हणाले, ‘नुसत्या समस्या सांगायच्या की त्या सोडवायच्या?’ लोक एकत्र आले तेव्हा उत्तर मिळालं बेबीकॉर्न. नाशिकमधील फिल्डफ्रेश प्रा. लि. या कंपनीकडून बियाणे आणण्यात आले. तुलनेनं हे मका बियाणे आकारानं लहान. एका एकरात ८ किलो बियाणे लागते. ६०० रुपये किलो बियाणाचा दर. मोटेंच्या भरवशावर आणि त्यांनी शेतकऱ्यांबरोबर केलेल्या सुसंवादामुळे बेबीकॉर्न लावण्यात आलं. मक्याचे तुरे काढायचे आणि कणसात दाणा भरू द्यायचा नाही, अशी काळजी घ्यायची, एवढंच शेतकऱ्यांना सांगितलेलं. ४५ दिवसांनी पीक काढायचं. या कणसाला चौदा थर असतात. कणीस सोलून दिलं तर ३५ रुपये किलो आणि न सोलता कंपनीला दिलं तर ६ रुपये किलो असा भाव. आसाराम पवार नावाचे शेतकरी सांगत होते, असं पीक घेता येतं हे आम्हाला माहीतच नव्हतं. येथे शंभर एकरावर बेबीकॉर्न केला जातो. या कणसातील आतला भाग ज्याला बिट्टी म्हणतात तो युरोपात मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. हा पदार्थ जेवणात नसेल तर नीट पचन होत नाही, असं मानणाऱ्यांचा म्हणे तिकडे मोठा वर्ग आहे. आता कणकोरीतील आसाराम पवार यांच्याप्रमाणंच अनेक जण बेबीकॉर्न हे पीक घेत आहेत. लागणारं पाणी तेवढंच. पण एक काळजी मात्र घ्यावी लागते, ६० दिवसांपर्यंत पीक काढायचेच. सगळा दोन महिन्यांचा खेळ. या युरोपातील बिट्टीने कणकोरीमध्ये आता समृद्धी आली आहे. हे प्रयोग सार्वत्रिक करता येणार नाहीत, हे खरेच. पण असे प्रयोग शेतकऱ्यांना पुढं घेऊन जाऊ शकतात.  नरसापूर आणि सारंगपूर हेदेखील गंगापूरमधील गाव. अण्णासाहेब शिंदे सांगत होते, गुळभेंडीचा हुरडा हे आमच्या गावचं पीक. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ३९१ एकरात फक्त हुरडा होतो. ज्वारीचं पीक असं गावकरी म्हणतच नाहीत. हुरडा करायचा आणि औरंगाबादच्या गुलमंडीवर विकायचा. अलीकडेच या गावाजवळ एक छानसं हॉटेल झालं आहे, ते हुरडय़ासाठी प्रसिद्ध. ज्वारीचा भाव तसा २८ ते ३० रुपये किलो आणि हुरडय़ाचा भाव १५० रुपये किलो. मराठवाडय़ात हुर्डा पाटर्य़ा होतात पण हुरडा पीक म्हणून त्याची बाजारपेठ काबीज करणारे नरसापूर आणि सारंगपूरचे शेतकरी हुशार. ज्याला विक्रीयोग्य माल बनवता येतो तो या व्यवस्थेत टिकून राहतो हे सूत्र सांगणारी ही तिन्ही उदाहरणं. कदाचित ही उदाहरणं सर्वत्र लागू पडणार नाहीत. एवढय़ा मोठय़ा कोरडवाहू क्षेत्रासाठी हे रामबाण उत्तरही नाही. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार काही बदल केले तर समृद्धी नांदते. गळफास जवळ करण्याची वेळ येत नाही. जगातील कोणती माणसं काय खातात याचा अभ्यास करून पीक पद्धतीमध्ये बदल केला तर असलेल्या पाण्यात चांगली शेती करता येऊ शकते. दिलीप मोटेसारखे काही विस्तारक असे प्रयोग करत असतात. पण संपूर्ण राज्यासाठी किती तरी विस्तारकांची गरज आहे. ती पूर्ण करणारी व्यवस्था सरकारकडून उभी राहणे हे आव्हान असणार आहे. मात्र, असे करताना सारे काही सार्वत्रिक करण्याचा घाट यंत्रणेनं आणि शेतकऱ्यांनी घालू नये. कोरडवाहूचं गणित सोडविणारे शेतकरी तसे फार संख्येत नसले तरी त्यांचे प्रयोग मात्र प्रेरणा देणारे आहेत.

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!