रायगड जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांत अतिवृष्टीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १ हजार ११६ गावे बाधित झाली. यात १८ हजार ५९५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. भात शेतीबरोबरच आंबा बागायतींना अतिवृष्टीचा तडाखा बसला.

रायगड जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. यापकी यंदा १ लाख ४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड करण्यात आली. भात लावणीची कामेही पूर्ण झाली. चांगला पाऊस पडत असल्यामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती. किड रोगांचा प्रादुर्भावही नव्हता. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु २५ जुल ते ५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पावसाने थमान घातले. पूरस्थिती निर्माण झाली. अतिपावसाने शेती पाण्याखाली गेली.

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे खाचरांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याच्या झोतामुळे जमीन खरडून गेली. बांध फुटले. उधाणाचे पाणी आले. शेतामध्ये माती भरली. दगडगोटे आले. त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले. या पावसाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग तालुक्याला बसला.

अलिबाग तालुक्यात १३२ गावांमधील ५ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावार भात शेती व आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात १७१ गावांध्ये ४ हजार २८१ हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला व आंबा बागायातीचे नुकसान झाले आहे.

महाड तालुक्यात ४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. तर मुरड तालुक्यात १५२ हेक्टर, खालापूर तालुक्यात १४८.५० हेक्टर,  कर्जतमध्ये १७९ हेक्टर,  पनवेलमध्ये १५४ हेक्टर, उरण ३७६ हेक्टर, माणगाव तालुक्यात ३५० हेक्टर, तळा तालुक्यात २६३ हेक्टर, रोहा ४७९ हेक्टर, पाली ४,२०हेक्टर, पोलादपूर तालुक्यात १ हजार ७०० हेक्टर, म्हसळ्यामध्ये ४८ हेक्टर, श्रीवर्धनमध्ये १.५० हेक्टर क्षेत्र अतिपावसामुळे बाधीत झाले आहे.

‘अतिपावसामुळे कृषिक्षेत्राचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचानामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यावर शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाईल. प्राथमिक सर्वेक्षणात अतिवृष्टीमुळे १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.’    – पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

‘भातशेतीबरोबरच आंबा बागायतींचेही मोठे नुकसान झाले आहे. आमच्या बागेतील १३५अंब्याची कलमे दरड कोसळल्याने कायमची नष्ट झाली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देताना आंबा बागायतींचाही विचार व्हावा.’      – संदेश पाटील, आंबा बागायदार