07 April 2020

News Flash

विषारी ‘रॅगवीड’ तणाचा महाराष्ट्रात शिरकाव

रॅगवीड या  परदेशी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे

अ‍ॅम्बरोसिया एटिमीसिफोलिया ही वनस्पती. तीस ते ९० सेंमी उंचीपर्यंत वाढते.

रॅगवीड या  परदेशी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे.  हे तण अ‍ॅम्बरोसिया या प्रजातीतील असून त्याच्या जगभरात ४१ प्रजाती आहेत. या सर्व प्रजाती समूहाला रॅगवीड या नावाने जगभर ओळखल्या जाते. अनेक परदेशी तणांनी भारतात प्रवेश करून इथल्या शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे हे तण आढळले आहे. या विषारी तणाचा शेतीबरोबरच मानवी व जनावरांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या प्रसारास शासनाने व संबंधित विभागाने वेळीच अटकाव करणे आवश्यक असल्याची माहिती कीडरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी दिली.

ते म्हणाले, या वनस्पतींचा अभ्यास करताना आम्हाला अ‍ॅम्बरोसिया एटिमीसिफोलिया ही वनस्पती पेठवडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील शेतात आढळल्याचे विविध माध्यमातून समजले. ही तणवर्गीय वनस्पती आहे. या तणाचे मूळ स्थान उत्तर अमेरिका आहे. हे तण १८६० पूर्वी केवळ उत्तर अमेरिकेत पसरले होते. त्यानंतर ते युरोप खंडातील युरेशिया, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी, क्रोएशिया, बल्गेरिया आदी देशांत पसरले. सन १९७० पर्यंत ते उत्तर अमेरिका व युरोप खंडापुरतेच मर्यादित होते. त्यानंतर त्याचा प्रसार वेगाने दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, तवान व चीन आदी देशांत झाला. १९९६ मध्ये हे तण भारतात सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड या राज्यांत आढळून आले. आजअखेर रॅगवीड तणाची शास्त्रीय नोंद ईशान्य भारताशिवाय देशाच्या उर्वरित भागात झाली नव्हती. पेठवडगाव भागात ते आढळल्याने त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तण अन्यत्र पसरत असून त्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.

अ‍ॅम्बरोसिया एटिमीसिफोलिया ही वनस्पती. तीस ते ९० सेंमी उंचीपर्यंत वाढते. तिला उग्र वास असून तिच्या फांद्या सरळ वाढतात. खोड व फांद्यांवर बारीक केसाळ लव पाने साधी मात्र लहान भागात विभागलेली, कातरलेली व लवयुक्त फुले येण्यापूर्वी हुबेहूब काँग्रेस गवतासारखी दिसते. फुले जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत येतात. फुले लहान, पांढरट-पिवळसर रंगाची. गोलाकार पुष्पगुच्छात येतात. एक रोप शंभर दशलक्ष ते ३० कोटी परागकण तयार करते. फळे गोलाकार त्रिकोणी आकाराची. त्याभोवती काटेरी पुष्पपर्णे. फळात त्रिकोणी – गोलाकार बी. एक रोप वर्षभरात तीन हजार बिया तयार करते.

बियांचा वेगाने प्रसार

फळे काटेरी असल्याने ती कशासही सहजपणे चिकटतात व त्यांचा वेगाने प्रसार होतो. फळांचा-बियांचा प्रसार प्राणी, पक्षी व माणसे, पाण्यामार्फत बिया निसर्गात ३९ वर्षांपर्यंत अबाधित राहू शकतात व सहजपणे रुजतात. मे-जून महिन्यात ९५ ते ९८ टक्के बिया रुजतात व नवीन रोपे तयार होतात. हे तण वेगाने वाढते व पसरते. प्रामुख्याने शेतात तसेच गवताळ कुरणे, ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेने, नदी काठावर आढळते. स्थलांतरित पक्ष्यांच्या विष्ठेतून तणाचा प्रसार दूरवर अनेक देशांत झाला असावा असे मानले जाते. आयात करण्यात येणाऱ्या सूर्यफुलांच्या बियांमध्ये रॅगवीडच्या बिया मिसळलेल्या आढळतात.

तणामुळे श्वसनाचे रोग

आयात केलेल्या कोंबडी खाद्यात तसेच पाळीव पक्ष्यांच्या खाद्यातही त्याच्या बिया आढळतात. एक किलो पक्षी खाद्यात ३.६ ग्रॅम वजनाच्या रॅगवीडच्या ७०० बिया आढळल्या आहेत. शेतातील अवजारे, वाहने व जनावरांना चिकटून, मातीच्या वाहतुकीतून व कंपोष्ट खतातून बियांचा प्रसार होतो. या तणामुळे पीक उत्पादनात घट होऊन नुकसान होते. विषारी असल्याने जनावरांच्या व प्रामुख्याने माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या तणाचे परागकण अ‍ॅलर्जी निर्माण करणारे आहेत. परागकणात एम्ब्रोसिन, आयसाबेलीन, सायलोस्टॅचीन, क्यू मॅनीन, पेरूव्हीन व अमायरिन हे सहा प्रकारचे अ‍ॅलर्जी निर्माण करणारे घटक आहेत. परागकणांत ओलिओरेझिन्सही आढळतात. फुलांच्या तीन-चार महिन्यांच्या कालावधीत मोठय़ा प्रमाणात परागकण तयार केले जातात. ते हवेत पसरतात. हवेमार्फत परागकण माणसाच्या सान्निध्यात आल्यास नाक व घसा सुजतो, श्वसननलिकेस सूज येते. सर्दी, खोकल्याचा त्रास. अंगात ताप. डोळे खाजतात, सुजतात असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2017 1:54 am

Web Title: agriculture suffered huge losses from ragweed toxic plants
Next Stories
1 बार्शीत डॉक्टरचा बंगला फोडून १६ लाखांचा ऐवज लांबविला
2 हिंगणी बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या चौघा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू
3 कोकण रेल्वेवरील प्रवास होणार ‘पारदर्शक’, १८ सप्टेंबरपासून ‘व्हिस्टाडोम’ कोच प्रवाशांच्या सेवेत
Just Now!
X