हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, घरात दाणा नाही, जगायचे कसे?

डहाणू : करोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र टाळेबंदी झाल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात हाताला काम नाही, खिशात दमडी नाही असे चित्र आहे. घरात दाणा नसल्याने जगण्याची भ्रांत आणि शेतात कसायचे तरी कसे, असा प्रश्न येथील आदिवासी बांधवांना सतावत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने केलेली टाळेबंदी व संचारबंदीचा मान्सून पूर्व शेतीच्या व मशागतीच्या कामांवर तसेच पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या आगोट खरेदी यावर परिणाम झाला आहे. संचारबंदीमुळे शेतात मजूर लावता येत नाहीत, अवजारे तसेच साहित्य खरेदीसाठी दुकाने बंद, त्यामुळे भाडय़ाचे ट्रॅक्टर तसेच अवजारांद्वारे मशागत तसेच शेतीपूर्व कामे करता येत नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. शेतीसाठी लागणारी रोकड स्थलांतर करून मजुरी करणाऱ्या मजुरांकडून मिळत असते. मात्र, त्यांनाही यंदा रित्या हाताने परत यावे लागले आहे. त्यामुळे यंदाची स्थिती ऐरवीपेक्षा जास्त हृयद्रावक असणार आहे.

पालघर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. भात हे पालघर जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एप्रिल महिन्यात शेतकरी भातपीक नियोजनामध्ये व्यस्त असतात. करोनामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाचे नियोजन रेंगाळले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मशागतीची कामे पूर्ण करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

याच काळात सुधारित संकरित वाणाची बियाणे कृषी खात्याकडून खरेदी करावी लागतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण होऊ शकत नसल्याने पुढील नियोजन कोलमडण्याच्या स्थितीत असल्याचे शेतकरी सांगतात. स्थलांतरित मजुरांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागल्याने शेतीसाठी खरेदी कशी करायची तसेच आगोटसाठी साहित्य कुठून खरेदी करावे, अशी विवंचना निर्माण झाली आहे.

पावसाळ्याची तजवीज म्हणून परिसरातील महालक्ष्मी, वज्रेश्वरी, निर्मळ, केळवे तसेच आजूबाजूच्या मोठय़ा जत्रा, यात्रा आणि आठवडे बाजारामधून पालघर डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांमधील रहिवासी सुकी, ओली मासळी, खारे मासे, शेतीची अवजारे, घरगुती मसाला, कांदे-बटाटे, लसून, धान्य, बियाणे तसेच जंगलातली औषधी साहित्याची खरेदी करतात.

तसेच, दरवर्षीच्या बाजार खरेदीचे आठवडे बाजार, यात्रा, जत्रा, उत्सव रद्द झाल्याने पावसाळ्यासाठी गोळा करून ठेवणारी आगोट खरेदी न झाल्याने ग्रामीण भागाचे व्यवहार कोलमडले आहेत. स्थलांतरित मजूर तसेच शेतकरी पावसाळ्यासाठी सुकी मासळी, कांदे-बटाटे, लसून तसेच शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी पैसे जमा करतात. त्यातून यात्रा, उत्सव, बाजारातून आगोटची खरेदी केली जाते. मात्र, यंदा यात्रा रद्द झाल्याने आगोटच्या परंपरेला खंड पडला आहे.

आम्ही सहकुटुंब एप्रिल, मे महिन्यांत शहरात रोकडीवर काम शोधतो. दोन पैसे मिळतात. त्यातून आगोट भरतो आणि शेतीसाठी पैसे जमा करतो. मात्र या वर्षी कामाच्या दिवसात हाल झाले आहेत. घरी खायला अन्न नाही, हाती दमडी नाही तर जगायचे कसे आणि शेती तरी कशी करायची!

– गोविंद चौधरी, स्थलांतरित मजूर.