देशामधील करोनाबाधितांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. असं असतानाच या आजारावर मात मिळवणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात प्रथमच करोनामुक्त झालेल्यांची संख्या अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या पुढे गेल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनावर मात करणाऱ्या या व्यक्तींमध्ये अहमदनगरमधील एका ८५ वर्षांच्या आजीबाईंचाही समावेश आहे. या आजीबाईसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत काम करणाऱ्या अहमदनगरमधील जिल्हा माहिती अधिकार कार्यालयानेच ट्विट केलं आहे.

इन्फो अहमदनगर (@InfoAhmednagar) या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये या आजी मुंबईहून अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव येथे आल्या असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याचे म्हटलं आहे. मात्र या ८५ वर्षीय आजींनी करोनाशी यशस्वीपणे दोन हात केले आणि त्या करोनामधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार घेतल्यानंतर घरी जातानाचे त्यांचे फोटो ट्विटवरुन जिल्हा प्रशासनाच्या माहिती अधिकार कार्यालयाने शेअर केले आहेत. चांगील बातमी असं म्हणत, “मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ८५ वर्षांच्या आजीबाई कोरोनातून बऱ्या! मुंबईहून अहमदनगर जिल्हयातील कोंडेगाव (ता.श्रीगोंदा) येथे आल्या होत्या.आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. डॉक्टर्स,नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले,” अशा कॅप्शनसहीत आजींचा रुग्णालयाबाहेर निघतानाच फोटो शेअर करण्यात आला आहे.

करोनामुळे युरोपीय देशांमध्ये वयस्कर लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड असल्याने ६५ वर्षांवरील व्यक्तींसाठी करोना अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच वयस्कर लोकांची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगातात. मात्र या आजींप्रमाणे करोनाला यशस्वीपणे मात देणाऱ्या वयस्कर रुग्णांची संख्याही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.