छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची आज, शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सकाळी साडेसात वाजताच त्याला न्यायालयापुढे हजर केले होते. याच कारणासाठी छिंदम याची नगरच्या सबजेलऐवजी अन्यत्र, नाशिक किंवा येरवडा कारागृहात रवानगी केली जाणार होती.

दरम्यान छिंदम याच्या वक्तव्याबद्दल दुसऱ्या दिवशीही जिल्ह्य़ात निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या. भिंगारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.  त्याची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.  छिंदम याने जामिनासाठी अर्ज केला नाही. मागणी केल्याने त्याच्या कुटुंबाला पोलिसानी संरक्षण दिले आहे. छिंदम याला शहराच्या मध्यवर्ती भागात हजर केल्याचे समजल्यावर मात्र कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता. काही कार्यकर्त्यांनी महापालिकेत छिंदम याच्या नावाच्या फलकांची आज पुन्हा तोडफोड केली. ज्या ठिकाणी छिंदम याच्या नावाचे फलक होते, त्यावरही काळे फासले. पोलिसांच्या सुचनेनुसार मनपा प्रशासनाने मुख्य इमारतीच्या काही दरवाजांना कुलपे लावली होती. महिला कार्यकर्त्यांनी छिंदम याने त्याच्या प्रभागात व सिद्धीबागेत लावलेल्या बाके व इतर साहित्याची तोडफोड केली. भिंगारमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये सर्व पक्षीय सहभागी झाले होते.

कारागृहात मारहाणीची चर्चा

श्रीपाद छिंदम याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्याला शहरातील सबजेलमध्ये हलवण्यात आले. तेथे मात्र कारागृहाबाहेर मोठी गर्दी झाली होती. सकाळी नऊच्या सुमाराला छिंदम याला कारागृहात टाकताच काही वेळानंतर लगेच, कारागृहातील कैद्यांनी घोषणाबाजी करत मारहाण केल्याची चर्चा समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यासंदर्भात कारागृहाचे अधीक्षक नागनाथ सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी छिंदमच्या निषेधार्थ कैद्यांनी घोषणाबाजी केल्याचे सांगितले मात्र त्याला मारहाण झाल्याचा इन्कार केला.

राजीनामापत्र प्राप्त

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी काल श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात त्याचे राजीनामापत्र महापौर कार्यालयाला आज दुपारपर्यंत मिळालेले नव्हते. त्यामुळे या पदावर छिंदम अद्यापी कायम असल्याची चर्चा सुरू झाली होती. दुपारी चारनंतर छिंदम याचे पत्र महापौर कार्यालयाला मिळाले.