आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षातील विद्यमान खासदारांनी आपली उमेदवारी निश्चित आहे असे समजू नये, असा इशाराच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला. शिवसेनेने सरकार व मुख्यमंत्र्यांवर कितीही टीका केली तरी युती करण्याची आमची इच्छा आहे,  आम्ही रणांगण सोडून पळून जाणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.

खासदार रावसाहेब दानवे हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये होते. रात्री उशिरा त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ४८ पैकी ३६ मतदारसंघाचे दौरे पूर्ण झाले आहेत, ज्या जागा भाजपाकडे नाहीत तेथेही दौरे केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील बैठकीत मी उपस्थित होतो, अमित शाह यांनी असा कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही. केवळ रणनीती ठरवण्यासाठी ती बैठक होती, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. पक्षाची उमेदवार ठरवण्याची एक पद्धत आहे, त्यानुसारच लोकसभेचा उमेदवार ठरवला जाईल. कोणत्याही खासदाराने उमेदवारी निश्चित समजू नये, कामगिरी पाहूनच निर्णय घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.

भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असले तरी आम्ही संघटना बांधणीच्या बळावर पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करु, असा दावा त्यांनी केला. महाआघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवारच ठरवू शकत नाही, तसा प्रयत्न केल्यास त्यांच्यात भांडणे होतील, त्यामुळेच शरद पवार निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जाईल, असे सांगत आहेत. तामिळनाडूत राहुल गांधी, शरद पवार यांच्यापासून तेथील राजकीय पक्ष दूर पळतात, ममता, बिजु पटनाईक, मायावती, अखिलेश आघाडीपासून दूर आहेत, याकडेही दानवेंनी लक्ष वेधले.