Ahmednagar Mayor election 2018: अहमदनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपदाने हुलकावणी दिली आहे. भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे हे महापौरपदी निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिल्याने याचे पडसाद साहजिकच राज्यपातळीवर उमटणार आहेत. मात्र, अहमदनगरमधील गुंतागुंतीचे राजकारण याला कारणीभूत असून भाजपा- राष्ट्रवादी एकत्र का आले, याचा घेतलेला आढावा….

शुक्रवारी नेमके काय झाले?
महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होणार होती. भाजपा व राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांनी अपापल्या नगरसेवकांना रात्री उशिरापर्यंत ‘व्हीप’ बजावलेला नव्हता, केवळ शिवसेना व बसपा या दोनच पक्षांनी पक्षादेश बजावलेला होता. शुक्रवारी सकाळी निवडणूक सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली आणि भाजपाचा मार्ग मोकळा झाला.

भाजपा आणि शिवसेना एकत्र का नाही?
अहमदनगरमध्ये एकूण ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ व अपक्ष २ असे संख्याबळ होते. शिवसेना व भाजप एकत्र आल्यास इतर कोणाची आवश्यकता भासणार नव्हती. पण राज्यातील सत्तेत एकत्र असलेले सेना व भाजप या दोन पक्षांमध्ये मनपातील सत्तेसाठी संवादच घडला नाही. दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांतील कटुता त्यांना एकत्र येण्यापासून रोखत होती. यात दोन्ही पक्षाचे नेते माजी आमदार अनिल राठोड (शिवसेना) व खासदार दिलीप गांधी (भाजपा) यांच्यातील वैयक्तिक वादाची स्वतंत्रपणे भर पडली होती. महापौरपद शिवसेनेला दिले तर भाजपा फक्त उपमहापौरपदावर समाधानी नव्हती. भाजपाची नजर स्थायी समितीवरही होती. त्यामुळे भाजपा- शिवसेना युती खोळंबली होती.

राष्ट्रवादी – शिवसेनेतील वाद?
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची धूरा आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्या खांद्यावर आहे. केडगाव येथे शिवसैनिकाची हत्या झाल्याने शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप झाले. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि शिवसेना हे कट्टर विरोधक झाले.

भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेसचा नगर पॅटर्न?
मागील निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी एकत्र आले होते, मात्र ऐनवेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवड सभेच्या सकाळी आदेश देऊन सेनेबरोबर जाण्यास सांगितले होते, त्यामुळे राष्ट्रवादी तोंडघाशी पडली होती. या निवडणुकीतही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आले होते. तसाच काहीसा प्रयोग मनपामध्ये करण्याचा सेनेचा प्रयत्न होता. तर भाजपाला त्याची परतफेड मनपामध्ये करायची होती. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचाही शिवसेनेवर राग होता. त्यामुळे शिवसेनेविरोधात एकत्र येण्यासाठी ही कारणे दोन्ही पक्षांसाठी पुरेशी ठरली.