अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षनेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १८ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांचे पक्षातून निलंबन केले जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

अहमदनगरमध्ये शुक्रवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. अहमदनगरमध्ये एकूण ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ व अपक्ष २ असे संख्याबळ होते. भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व राष्ट्रवादीचे संपत बारस्कर यांच्यात तिहेरी लढत होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विराजमान झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला साथ दिल्याने याचे पडसाद राज्यातील राजकारणावर उमटले. याची दखल राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही घेतली आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावत भाजपाला साथ दिल्याने १८ नगरसेवकांना आणि एका आमदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधितांचे पक्षातून निलंबन केले जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

वाचा: …म्हणून अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी- भाजपा एकत्र?

दरम्यान, या निवडणुकीत आधी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक काकडे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. ‘नगरचे राजकारण आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांना करायचे आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणूकही त्यांना लढवायची आहे. त्यामुळे त्यांच्या व पक्षाच्या दृष्टीने ते राजकारण करतील’, असे सांगत त्यांनी स्थानिक नेत्यांनी भाजपाला साथ देण्याचे ठरवले, असे म्हटले होते. मात्र, निवडणुकीच्या दोन दिवसपूर्वी पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपासमवेत जाण्यासाठी नकार कळवला होता, असे सूत्रांनी सांगितले.