नगर : नगरकरांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादीच्या जागा कायम राहिल्या. सत्ता स्थापनेसाठी आम्ही दावा करणार आहोत, त्यासाठी काँग्रेसशी चर्चा केली जाईल. शिवसेना व भाजपने मंत्र्यांमार्फत, प्रशासनामार्फत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्रास दिला, पोलिसांनीही आमच्यापुढे अडचणी निर्माण केल्या, या दोन्ही पक्षांनी आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणावर केली. प्रचारात केवळ राष्ट्रवादी पक्षालाच ‘टार्गेट’ करण्यात आले होते, तरीही आम्ही आमच्या जागा कायम राखल्या आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली

आम्ही पुर्ण ताकदीने निवडणुक लढवली. शहराला एक वेगळी ओळख, एक नवा चेहरा देण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु त्याला नगरकरानी साथ दिली नसली तरी भाजपला जनतेचा कौल मान्य आहे, या परिस्थितीही भाजप पुन्हा नव्या जोमाने नगर शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत राहील. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचे चिंतन नंतर केले जाईल असे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी म्हटले आहे.

श्रीपाद छिंदम पुन्हा विजयी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा, त्यामुळे उपमहापौर गमवावे लागणारा, निवडणुक काळात शहरातुन तडीपार होण्याची कारवाई झालेला अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम पुन्हा विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीतही त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती, तरीही तो विजयी झाला होता. त्याच्या वक्तव्यामुळे केवळ शहरच नाही तर राज्यातही उद्रेक झाला होता. परंतु प्रभागातील मतदारांनी त्याच्या बाजूने कौल दिला. भाजप, सेना व मनसे यांच्या तिहेरी लढतीने तो विजयी झाला. त्याची पत्नी स्नेहा याही अपक्ष उमेदवार होत्या मात्र त्या पराभुत झाल्या. दरम्यान काल, मतमोजणीच्या वेळी मतदान केंद्रात मतदान यंत्राची पुजा केल्याच्या कारणावरुन, मतदान केंद्राध्यक्षाच्या तक्रारीवरुन रात्री तोफखाना पोलिसांनी श्रीपादचा भाऊ श्रीकांत याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

६ तास मतमोजणी

भवानीनगर भागातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु झाली. प्रथम टपाली मतदान मोजण्यात आली. एकाच वेळी सर्व म्हणजे १७ प्रभागातील मोजणी तीन टेबलवर केली जात होती. सकाळी ११.३० च्या सुमाराला कल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ च्या सुमाराला जागांचे चित्र स्पष्ट झाले. सुमारे ६ तास मतमोजणी सुरु होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा तेथे तळ ठोकून होते. केंद्राच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुलाल उधळल्याने लाठीमार

विजयाबद्दलच्या गर्दीच्या भावना उचंबळून आल्या, त्यातून पोलिसांच्या गणवेशावर गुलाल उधळला गेल्याने मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिस व राज्य राखीव दलाच्या जवानांनी जमावावर लाठीमार केल्याची घटना, दुपारी १.३० च्या सुमाराला घडली. जमावाच्या पळापळीने काही मोटरसायकलींचे नुकसान झाले तर रस्त्यावर चपलांचा खच पडलेला होता. भवानीनगरमधील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होती, निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लाठीमाराची घटना प्रभाग १० च्या मतमोजणीच्या वेळी ही घटना घडली. या प्रभागात मोजणीचा फेरीनिहाय कल बदलत होता, त्याचा परिणाम केंद्राबाहेर जमलेल्या जमावावर होत होता. पोलिस उअधिक्षक संदीप मिटके व प्रशिक्षणार्थी अधिकारी पूनम पाटील तेथे आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.