अहमदनगर महापालिका महापौरपद निवडणूक ३० जूनला

नगर : महापालिकेच्या सत्तेसाठी अखेर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये आघाडी करण्याचा निर्णय झाला असून महापौरपद शिवसेनेला तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे असा निर्णय राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी मुंबईत  झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिली. शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे या दोन पक्षांच्या आघाडीला महापालिकेत पूर्ण बहुमत प्राप्त होणार आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या महापालिकेच्या सत्तेतील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पदाची मुदत दि. ३० जूनला संपते आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी महापौर पदाच्या निवडीसाठी, शेवटच्या दिवशी दि. ३० जूनला सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली  सभा आयोजित केली असून ती ऑनलाइन  होणार आहे.

शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या १९ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्षावर पक्षाने हकालपट्टीची कारवाई केली होती. परंतु नंतर ही कारवाई मागे घेतली. भाजपला पाठिंबा देताना राष्ट्रवादीने सुरुवातीला सत्तेत सहभागी होणार नाही, असे सांगितले होते, मात्र नंतर सत्तेतील पदे स्वीकारली.

आता राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी निर्माण झाल्याच्या पाश्?र्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी नगर महापालिकेतही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांना आज मुंबईत पाचारण केले होते. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनीही आ. जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे व अनिल बोरुडे आदी या वेळी उपस्थित होते.

शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी संजय शेंडगे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे.

या पदासाठी शिवसेनेच्या रीटा निलेश भाकरे इच्छुक होत्या. परंतु नंतर त्यांनी माघार घेतली. या पदासाठी राष्ट्रवादीकडून रूपाली पारगे इच्छुक होत्या. भाजपकडे या पदासाठी उमेदवार नाही.

राष्ट्रवादीचे मौन

महापालिकेतील सत्तेसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख कोरगावकर यांनी राष्ट्रवादीसमवेत आघाडी झाल्याचे सांगितले असले, तरी राष्ट्रवादीकडून या संदर्भात मौन बाळगले जात आहे. राष्ट्रवादीचे नगर शहरातील सर्वेसर्वा आ. संग्राम जगताप यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी मोबाइलवर प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय, या संदर्भातील प्रश्न अनुत्तरित होता.

..तर काँग्रेस निवडणूक लढवणार

राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी असे तीन घटक पक्ष आहेत. परंतु केवळ शिवसेना व राष्ट्रवादी या दोनच पक्षात आघाडी झाल्याचे जाहीर केले जात असेल तर आपण महापौरपदाची निवडणूक लढवू, असे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार शीला दीप चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते, मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे आहेत, त्यांच्याकडून आपल्याला अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, परंतु काँग्रेसला डावलले जात असेल, तर आपण निवडणूक लढवणार, असे त्यांनी सांगितले.

शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते

शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी जाहीर होण्याच्या काही वेळ अगोदर पत्रकारांशी बोलताना भाजपचे माजी मंत्री राम शिंदे व शिवाजी कर्डिले यांनी महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नसला, तरी या निवडणुकीत भाजप ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल असे सांगितले. कर्नाटकमध्ये भाजप व काँग्रेसकडे अधिक आमदार असूनही अल्पमतातील कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, असे सांगत महापौर पदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी काहीही घडू शकते, असे सूतोवाचही शिंदे यांनी केले.

पक्षीय संख्याबळ

बहुमतासाठी संख्या ३४

शिवसेना-२३

राष्ट्रवादी-१९

भाजप-१५

काँग्रेस-०५

बसप-०४

अपक्ष-०१

एक जागा रिक्त

एकूण ६८