नगर : भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या चांद्रयान-२ मोहिमेत नगरकर शास्त्रज्ञाचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. या मोहिमेत संदेश दळणवळण पथकाचे नेतृत्व प्रदीप देवकुळे या नगरकर तरुणाकडे होते. चांद्रयान-२ चंद्रावर उतरल्यानंतर तेथील माहिती देशातील बंगळुरु येथील केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करणे, त्याची निर्मिती करणे तसेच मोहिमेत त्याची जुळणी करणे ही सर्व जबाबदारी प्रदीप देवकुळे यांच्याकडे आहे.

प्र्दीप देवकुळे मूळचे नगरचे उपनगर असणाऱ्या भिंगारचे रहिवासी. त्यांचे वडील सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. प्रदीप यांचे शालेय शिक्षण, इयत्ता दहावीपर्यंत भिंगार विद्यालयात झाले. नंतर त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर महाविद्यालयात घेतले. नंतर औरंगाबाद येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले, तीन वर्षे खासगी नोकरी केल्यानंतर सन २००८ पासून ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) नियुक्त झाले व संस्थेच्या उपग्रह केंद्रातील संदेशवहन गटात ते वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. यापूर्वीही त्यांनी इस्रोच्या मंगळयान मोहिमेत भूमिका पार पाडली आहे.

चांद्रयान-२ ने काल, सोमवारी चंद्राकडे यशस्वी झेप घेतल्यानंतर प्रदीप देवकुळे यांचे त्यांचा मित्रपरिवार, नातलग व आप्तेष्टांनी त्यांचे अभिनंदन केले. चांद्रयान-२ चंद्रावर ४८ दिवसांनी उतरल्यानंतर, ‘प्रज्ञान रोव्हर’ने संकलित केलेली माहिती ‘विक्रम लँडरकडे’ पाठवणार आहे. विक्रम लँडरकडून ही माहिती ऑर्बिटरकडे पाठवून, ऑर्बिटर ती माहिती बंगळुरु येथील केंद्रात पाठवणार आहे. त्याच्याकडून आलेले संदेश आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी लागणारे अँटिना, रिसिव्हर, ट्रान्समीटर तयार करण्याची जबाबदारी प्रदीप देवकुळे यांच्याकडे होती.

याशिवाय चांद्रयान-२ कडून दिले जाणारे संदेश व त्याच्याकडे पाठवले जाणारे संदेश वहन करण्यासाठी लागणारी अशाच स्वरूपाची यंत्रणा निर्माण करण्यात, त्याची जोडणी करण्यात देवकुळे यांचा सहभाग होता. यासाठी संगणकावर तयार केलेले डिझाइन व प्रत्यक्ष वापरातील डिझाइन याची तपासणी करून त्याची जोडणी करण्याची भूमिकाही देवकुळे यांनी पार पाडली. अँटेना, ट्रान्समीटर, रिसिव्हर यासाठी लागणारे पूर्वप्रारूपहीही त्यांनी बनवले.

इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाला पुन्हा एकदा नवी उंची गाठून देण्याची क्षमता दाखवून दिली आहे, अमेरिका, रशिया, चीन यापूर्वी चंद्रावर जाऊन आले आहेत. आता भारतही त्यांच्या यादीत लवकरच समाविष्ट झालेला असेल, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे, चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण हा भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील खूपच मोठा पल्ला आहे, अशी प्रतिक्रिया देवकुळे यांनी व्यक्त केली.