‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून सत्ता मिळवणाऱ्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून दुष्काळी छावण्यांची फक्त घोषणा केली, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुष्काळासारख्या संकटामध्ये देखील राजकारण करणे हे मानवतेला काळिमा फासण्यासारखेच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केली.

अहदमनगरमधील राशीन येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असून दर मंगळवारी येथे जनावरांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी-विक्री होते. मंगळवारी सकाळी रोहित पवार हे या बाजारात पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. दुष्काळी छावण्यांची घोषणा करण्यात आली असली तरी अहदमनगरमधील कर्जत व जामखेड तालुक्यात याची फारशी अंमलबजावणी झाली नाही, पालकमंत्री छावण्या मंजूर करण्यात राजकारण करत आहेत. दुष्काळासारख्या संकटामध्ये देखील राजकारण करणे हे मानवतेला काळिमा फासण्यासारखेच आहे, अशी टीका त्यांनी केली.

जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकर सुरू केले आहेत. जिथे पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी मागणी करा, त्या ठिकाणी आपण टँकर देऊ, जनावरांच्या छावण्या नाहीत, तिथे आपण छावण्या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.