अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कारवाई टाळण्यासाठी एका तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. बापू तुकाराम पवार असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि मद्यपान करुन वाहन चालवल्याच्या आरोपावरुन दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बापू पवार हा आष्टीहून नगरमध्ये सासुरवाडीला आला होता. नातेवाईकांना भेटल्यानंतर तो दुचाकी घेऊन निघाला. पत्रकार चौकात त्याला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. दुचाकीची कागदपत्रे तपासणी केली. त्यावेळी तो नशेत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याचे वाहन ताब्यात घेऊन त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याने पोलिसांबरोबर हुज्जत घातली.  पोलीस ठाण्यात तो इकडे तिकडे फिरत बसला, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याचे चित्रीकरण झाले आहे. पोलिसांनी कडक कारवाईची भूमिका घेतल्यावर तो गडबडला.

पाणी पिण्याच्या बहाण्याने तो पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोरील कुलरजवळ गेला. पाणी पितो असे सांगून  खिशातून त्याने बाटली काढून विषप्राशन केले, पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पवारविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.