पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा फटका जम्मू-  काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला बसण्याची चिन्हे आहेत. अहमदनगरमधील टुरिझम फोरमने हल्ल्याचा निषेध आणि जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फोरमचे सदस्य एकही पर्यटक या वर्षभरात काश्मीरमध्ये पाठवणार नाही.

अहमदनगर टुरिझम फोरमचे मुख्य प्रवर्तक चैतन्य ट्रॅव्हल्सचे किशोर मरकड यांनी बुधवारी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती दिली. फोरमने हा निर्णय पंतप्रधान, केंद्रीय पर्यंटन मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कळवला आहे. या वेळी फोरमचे सदस्य श्रीपूजा इंटरनॅशनलचे नीलेश वैकर, आनंद हॉलिडेचे सागर सहाणी, राजलक्ष्मी हॉलिडेजचे प्रसाद मांढरे, व्हिजन टुरिझमचे गिरीश कोठारी, स्मित हॉलिडेजचे दिनेश शिंदे, आनंद ट्रॅव्हल्सचे हेमंत धोका व ईश्वर धोका आदी उपस्थित होते.

मरकड यांनी म्हणाले, काश्मीरमधील सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आम्हाला पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, गेल्या तीन ते चार वर्षांपासून परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. काश्मीर हा प्रदेश पर्यटनावर अवलंबून आहे. देशातील सर्वाधिक बर्फवृष्टी तेथे होते व निसर्गसौंदर्यही काश्मीरमध्येच आहे. परंतु तेथील दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानांना वीरमरण आले. असे दहशतवादी हल्ले भारतातील पर्यटन विकासाला खिळखिळे करणारे आहेत. भारताने या दहशतवादाविरुद्ध तातडीने पाऊले उचलावीत. इतर देश पर्यटनाबद्दल जागरुक आहेत. मात्र भारतात पर्यंटन क्षेत्राविषयी वरिष्ठ पातळीवर उदासीनता आहे, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्याप्रमाणात सुविधा वाढत नाहीत, याकडे फोरमच्या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.