‘स्मार्ट सिटी’ योजनेत निवड झालेल्या सोलापूर शहरात वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिलेच वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याचा दावा महापालिकेच्या सूत्रांनी केला असून, आज त्याचे उद्घाटन करण्यात आले.

शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या बाळीवेशीत सुमारे १२ लाख रुपये खर्च करून हे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहात पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी पाच अशी दहा शौचालये उपलब्ध झाली आहेत. या सुलभ स्वच्छतागृहात कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाळीवेशीसह जवळच्या टिळक चौक, मधला मारुती परिसर, हलवाई गल्ली तसेच फलटण गल्ली हा संपूर्ण भाग वर्दळीचा आणि प्रमुख बाजारपेठेचा मानला जातो. येथे सामान्य ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांचीही सतत वर्दळ असते. विशेषत: परगावच्या ग्राहकांची गर्दी लक्षणीय असते. त्यांच्यासाठी बाळीवेशीत हे सार्वजनिक स्वच्छतागृह यापूर्वीच बांधण्यात आले होते. मात्र आता त्यात वातानुकूलित यंत्रणेची सोय करण्यात आली आहे. अशा प्रकारे उभारले गेलेले हे राज्यातील पहिलेच वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याचा दावा महापालिकेच्या सूत्रांनी केला आहे.

सोलापूर शहर स्मार्ट होण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी मिशन’मध्ये पहिल्या दहा शहरांची निवड करताना त्यात सोलापूरचा समावेश केला आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी एकूण सुमारे २२४६ कोटींचा आराखडा मंजूर आहे. या ‘स्मार्ट सिटी’ची शोभा वाढण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून बाळीवेशीत हे पहिले वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.