News Flash

लष्कराच्या हवाई दलाची प्रभावी कामगिरी

भारतीय लष्कराच्या हवाई दलाने जम्मू-काश्मीर, उत्तर-पूर्वी क्षेत्र, सियाचीन, श्रीलंका आणि काँगो या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी निभावली आहे.

| November 16, 2014 06:54 am

भारतीय लष्कराच्या हवाई दलाने जम्मू-काश्मीर, उत्तर-पूर्वी क्षेत्र, सियाचीन, श्रीलंका आणि काँगो या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी निभावली आहे. या दलाची ही परंपरा प्रशिक्षणार्थीनी पुढे न्यावी, अशी अपेक्षा स्टाफ आर्मी ट्रेनिंग कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. सच्चर यांनी व्यक्त केली. येथील आर्मी एव्हिएशनच्या स्कूलतर्फे शनिवारी आयोजित २२ व्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. या निमित्ताने लष्कराच्या हवाई दलात ३७ वैमानिकांची तुकडी नव्याने समाविष्ट झाली आहे.
गांधीनगर येथील स्कूलच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास ब्रिगेडिअर कंवलकुमार उपस्थित होते. या वेळी प्रत्यक्ष युद्धात या दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक व ध्रुव या हेलिकॉप्टर्सने सहभाग नोंदविला. हवाई छत्रीद्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखविण्यात आले.
सुमारे अर्धा तास चाललेल्या प्रात्यक्षिकांनी स्कूलच्या मैदानास रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लष्कराच्या हवाई दलातील वैमानिकांची कमतरता भरून काढण्यासाठी या स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांना येथे सुरुवातीला ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हिएटर्स’ हे कोर्स करावे लागतात. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव प्रशिक्षणार्थीना दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३७ प्रशिक्षणार्थीची तुकडी या माध्यमातून लष्कराच्या हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाली. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन करतानाच सच्चर यांनी सीमावर्ती भागात प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.
वैमानिकांनी आपण केवळ वैमानिक नाही तर आकाशातील लढाऊ सैनिक  म्हणून कार्यरत राहणे आवश्यक आहे. सुरक्षित उड्डाण महत्त्वाचा घटक असून हेलिकॉप्टर, त्यातील अधिकारी व कर्मचारी आदींचे मूल्य नेहमीच लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. दैनंदिन कामाशी निगडित प्रशिक्षण पूर्ण झाले असले तरी सीमावर्ती भागात वेगवेगळी भौगोलिक स्थिती आहे. लेह, लडाख व अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक भागांत रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्या ठिकाणी खराब हवामानात पायदळाच्या पुरवठा व्यवस्थेची जबाबदारी हवाई दलास सांभाळावी लागते. या अवघड परिस्थितीत वैमानिक उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वेळी प्रशिक्षणात वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात कॅप्टन प्रभज्योतसिंग, कॅप्टन, राजसिंग, सवरेत्कृष्ट कामगिरीसाठी कॅप्टन पंकज भाटिया यांचा समावेश आहे. पंजाब सरकारतर्फे लष्कराने प्रथम वापरलेले ‘बेल ४७’ हेलिकॉप्टर स्कूलला देण्यात आले आहे. स्कूलच्या आवारात ते जतन करण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आले. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:54 am

Web Title: air force effective task
Next Stories
1 अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा
2 मुंबईपाठोपाठ नागपूरमध्ये जलाशयावर ‘विमान सफर’
3 अवकाळी तडाखा!
Just Now!
X