विशाखापट्टणमहून नवी दिल्लीला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड झाल्याने हे विमान तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले. या विमानातील प्रवाशांच्या मदतीसाठी आलेल्या विमानातही बिघाड झाल्याने सोमवारी रात्रीपर्यंत तंत्रज्ञांची धावपळ सुरू होती.
एअर इंडियाचे एआय ४५२ हे विमान विशाखापट्टणमहून सकाळी नऊ वाजता नवी दिल्लीला जाण्यासाठी निघाले. काही अंतरानंतर विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. वैमानिकाने तातडीने नागपूरच्या विमानतळावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून ही बाब कळविली. नव्वद मिनिटे विमान आकाशात होते. नागपूर येताच या विमानाला आकस्मिक उतरण्यास परवानगी देण्यात आली.
विमान नागपूरला उतरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. अचानक नागपूरला विमान का उतरविले जात आहे, अशी विचारणा विमानातील १७७ प्रवाशांनी वैमानिकाला केली. नागपूरला उतरल्यानंतरही प्रवाशांना विमानाबाहेर जाऊ दिले जात नव्हते.
नागपूरच्या विमानतळावरील व्यवस्थापक विमानात गेले आणि त्यांनी प्रवाशांना परिस्थितीची जाणीव करून दिली. या प्रवाशांना विमानात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले.
नागपूरच्या विमानतळावर तंत्रज्ञांचे पथक विमानाच्या इंजिनाची तपासणी करू लागले. दुपापर्यंत त्यांना यश न आल्याने दुपारी तीन वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला संपर्क साधण्यात आला. तेथून नागपूरला विमान आले. मात्र, येथे उतरल्यानंतर त्यातही बिघाड झाला. ते विमान दुरुस्त करण्यासाठी दुसरे पथक कामी लागले. रात्री उशिरा गोएअरच्या विमानाने या प्रवाशांना दिल्लीला पाठविण्यात आले. दुपारनंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांचे मोबाइल ‘बंद’ झाले होते.
दरम्यान, देशाच्या मध्यवर्ती असलेल्या नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर अनेकदा विमाने आकस्मिकरीत्या उतरतात. विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला असला तरी त्यामानाने आणखी सोयी येथे व्हावयास हव्या, मात्र तसे झालेले नाही. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने येथे आणखी व्यवस्था व्हावयास हवी, तंत्रज्ञांची संख्या वाढवावयास हवी, अशी अनेकदा मागणी झाली आहे.