मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी शहरांमधील प्रदूषणात वाढ होत आहे. २९ टक्के औद्योगिक कारखान्यांतून धोकादायक रासायनिक वायू हवेत सोडला जात आहे. मुंबईत तर दर १० पैकी ९ जण प्रदूषित हवेत श्वासोच्छ्वास करीत आहेत, या पाश्र्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील १७ प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

मुंबईसह इतर भागांतील प्रदूषणाबाबत पराग अळवणी, योगेश सागर, अस्लम शेख, अमिन पटेल आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात महानगरातील प्रदूषणात वाढ होत असल्याची कबुली पर्यावरणमंत्र्यांनी दिली आहे.

मुंबईत पन्नास ठिकाणी तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व चंद्रपूर या पाच महापालिका क्षेत्रांत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याबाबत तसेच हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत एका कंपनीने पर्यावरणमंत्र्यांपुढे या बाबतीत सादरीकरण केले असून या कंपनीच्या मदतीने मुंबई व राज्यातील अन्य प्रदूषित शहरांत वाहने, इमारतीच्या बांधकामातील धूलीकण, धुरामुळे होणारे प्रदूषण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यावर भर देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

गंभीर स्थिती..

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या वायू प्रदूषणाच्या चाचणीत राज्यातील मुंबई, पुण्यासह चंद्रपूर, सोलापूर नवी मुंबई आदी शहरांतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबई प्रदूषण नियंत्रण विभागाच्या दुर्लक्षामुळे दर दहापैकी नऊ  लोक प्रदूषित हवेत श्वासोच्छ्वास करीत असल्याचे आढळून आले आहे.

हवेतील प्रदूषण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याशिवाय हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील १७ प्रदूषित शहरांचा कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.          – रामदास कदम, पर्यावरणमंत्री