मुंबईत होणारा शपथविधी सोहळा पाहण्यास हवाईमार्गाने जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. शहरातून मुंबईला जाणाऱ्या सर्व विमानांमधील जागा आरक्षित झाल्या आहेत. विशेषत: बीड जिल्ह्यातून अनेकांनी मुंबईचा रस्ता धरला. ट्रॅव्हल्स व खासगी वाहनांतून जाणाऱ्यांची संख्या तब्बल १० हजारांहून अधिक असू शकते, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.
नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांचे नाव नक्की आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना ज्या पद्धतीने साथ दिली, त्याचे कौतुक होत आहे. त्यामुळे बीडमधून सोहळा पाहण्यासाठी कार्यकत्रे सुरक्षा पासची मागणी करीत आहेत. औरंगाबादमधूनही कार्यकत्रे जाणार आहेत. फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नावाची चर्चा आहे. औरंगाबाद शहरातील आमदार अतुल सावे यांच्या मंत्रिपदासाठी व्यूहरचना करण्यात आली. त्यामुळे त्यांचा समावेश होतो की नाही, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. त्यासाठीच कार्यकर्ते जाणार आहेत. लातूरमधून संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रातील बडे नेते कोणाच्या बाजूने याचीही चर्चा रंगली आहे. परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनाही मंत्रिपदाची आशा आहे. ते मुंबई मुक्कामी आहेत.
आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळणार असल्याचा विश्वास बाळगून प्रमुख कार्यकत्रे मुंबईतच तळ ठोकून आहेत. काहींनी विमानाची तिकिटेही काढली. परिणामी, हवाई वाहतूक गर्दीची बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांचीही गर्दी वाढली आहे. त्यातच राजकीय घडामोडींना लक्षणीय वेग आल्याने प्रवासीसंख्या वाढल्याचे जेट एअरवेजचे मोहम्मद जलील यांनी सांगितले.