राज्यात युतीची सत्ता येताच राज्य सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जाईल. त्यातून अजित पवार आणि कंपनीला तुरुंगात पाठवू, असा इशारा भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
कापूस, ऊस, सोयाबीनला अधिक भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी सुरू केलेल्या लातूर ते औरंगाबाद शेतकरी दिंडीत रविवारी मुंडे सहभागी झाले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्य सहकारी बँकेत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच मोठय़ा प्रमाणात भ्रष्ट्राचार केला आहे. त्यांनीच ही बँक बुडवली. पवार आणि कंपनीच्या साखर कारखान्यांनी बँकेचे करोडो रूपये थकविले. एवढेच नव्हे तर कारखाने अडचणीत आणायचे आणि नंतर ते कवडीमोल किंमतीत म्हणजेच २०-२५ कोटी रूपयांत विकत घ्यायचे, असा उद्योग या मंडळींनी केला असून युतीचे सरकार सत्तेवर येताच या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. त्यातून पवार आणि कंपनीला गजाआड जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील साखर कारखाने यंदा संकटात असून ते सावरण्यासाठी केंद्राने बिनव्याजी दहा हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून द्यावे. केंद्रात भाजपची सत्ता असताना अशाच प्रकारे कारखान्यांना साडे सहा हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले होते. आताही अशा मदतीची गरज असून ती मिळाली नाही तर किमान १०० कारखाने बंद पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.