२०१४ मध्ये भाजपची देशभरात लाट होती आता मात्र या फसव्या सरकारला ओहोटी लागली आहे. मी कोकणचा आहे त्यामुळे समुद्राची भरती ओहोटी जवळून पाहिली आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी भाजप सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. राष्ट्रवादीची ‘हल्ला बोल’ यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. आज ही यात्रा नांदेडमधील उमरी या ठिकाणी पोहचली असून त्याचवेळी झालेल्या भाषणात त्यांनी ही टीका केली आहे.

सरकारने शेतकऱ्यांबाबतही उदासीन भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी न देऊन सरकारने बळीराजाचा अपमान केला आहे. २०१९ मध्ये भाजपला अपमानित केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असेही तटकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्याची दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने मदत जाहीर करावी अशीही मागणी यावेळी तटकरे यांनी केली.

याच हल्लाबोल यात्रेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर ताशेरे झाडले. देशाचे कृषीमंत्री कोण असा प्रश्न विचारला तर शेतकऱ्यांना त्यांचे नावही ठाऊक नाही. आपले प्रश्न समजण्याची आणि ते सोडवण्याची दृष्टी असलेले नेते जनतेने निवडून दिले पाहिजे. शेतीबाबत ज्यांना आस्था आहे अशा लोकांना निवडून द्या असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

भाजपच्या सरकारने शेतकरी हिताचा आजवर कोणता निर्णय घेतला आहे? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महिलावर्गाची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मात्र या प्रश्नाकडे लक्ष देण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही अशीही टीका अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केली.