News Flash

तटकरे, अजित पवारांचा जेलभरो आंदोलनात सहभाग

शेतक-यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जेलभरो आंदोलन केले जाणार आहे

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, कर्ज माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १६ सप्टेंबर दरम्यान नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकार दुष्काळ निवारणाच्या उपाय करताना भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लगतच्या बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी छावण्या सुरू करण्यात आल्या. नगर जिल्हय़ातही गंभीर परिस्थिती असताना मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
मुख्यमंत्री उद्या, शुक्रवारी नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा हा दौरा ‘उशिरा जाग’ आल्यासारखा आहे. पालकमंत्रीही लक्ष घालत नाही, अशी टीका करून घुले म्हणाले, जिल्हय़ात पिण्याच्या पाणी योजनांचे उद्भव कोरडे पडत आहेत. टँकर कोठे भरावेत असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पाणी मिळत नाही. जनतेच्या आक्रोशाची जबाबदारी सरकारला स्वीकारावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यातच आम्ही भेट घेऊन शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, वीजबिल माफ करा, आदी मागण्या केल्या होत्या. परंतु त्याची दखल घेतलेली नाही. परिणामी, आंदोलन करावे लागणार आहे.
कर्जमाफी हवी
नगर जिल्हा सहकारी बँकेने १ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान खरीप, रब्ब, ऊस, फळबागा, भाजीपाला व इतर प्रकारच्या कर्जासाठी एकूण १ हजार २८० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत व इतर बँकांनाही कर्ज वितरण केले आहे. सरकारने आता सर्वच धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. ते आता शेतीसाठी, पिकांसाठी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून एकरी १ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी चंद्रशेखर घुले यांनी केली.
 …तरच कारखाने बंद
कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी जिल्हय़ातील ऊस गाळप न करता साखर कारखाने बंद ठेवावेत, अशी सूचना केली आहे. त्यावर प्रतिक्रया व्यक्त करताना घुले म्हणाले, की कारखान्यांवर ऊसतोडणी कामगार, साखर कामगार, ऊस उत्पादक अशा हजारो कुटुंबांची जबाबदारी असते. या सर्व कुटुंबाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, मगच कारखाने बंद ठेवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 3:35 am

Web Title: ajit pawar and tatkare will participate in jail bharo movement
टॅग : Tatkare
Next Stories
1 दुष्काळामुळे आपत्कालीन योजना तयार केली का? – उच्च न्यायालयाचा सवाल
2 दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, मराठवाड्यात जेलभरो आंदोलन
3 कोकणातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ
Just Now!
X