कर्जमाफीचे अर्ज करणाऱ्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत, असे म्हणताना लाज, लज्जा किंवा शरम कशी वाटत नाही, शेतकऱ्यांना बोगस कसे काय म्हणता अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी येथे प्रत्यक्ष नाव न घेता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. समर्थ सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थापनी होते.

अजित पवार म्हणाले, पेट्रोल खरेदी करणारे उपाशी मरणार नाहीत, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध काय बोलावे, आता मजूरसुद्धा मोटारसायकलवर येतात हे यांना कुणी सांगावे, सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात आहे. राज्यात विजेचे भारनियमन का तर महानिर्मिती वीज कंपनीने वेळेवर कोळसा खरेदी केला नाही म्हणून! यांचे नियोजन चुकल्यामुळे जनतेला त्रास होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आमदार सतीश चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतच अशा प्रकारचे बारा कोटी रुपये थकलेले आहेत. नवीन शिक्षकभरती बंद आहे. म्हणतात की एका दिवसात दहा लाख व्यक्ती फुटबॉल खेळल्या. मुख्यमंत्र्यांनी एका फुटबॉलला लाथ मारली की झाले दहा लाख खेळाडू! मुंबई-अहमदाबाद दरम्यान एक लाख दहा हजार कोटीची बुलेट ट्रेन होणार आहे. विकासाला आमचा विरोध नाही. परंतु अगोदर आहे त्या रेल्वेचा कारभार आणि प्लॅटफॉर्म तरी दुरुस्त करा. काही दिवसांपूर्वी एकाच दिवसात मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना २४ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. भाजपचे खासदार नाना पटोले रोज त्यांच्याच सरकारविरुद्ध काय बोलतात ते एकदा पाहा. एकनाथ खडसे विरोधी पक्षात असताना जोरात बोलत असत, आता भाजपचे सरकार असताना त्यांचा आवाज कमी झालेला आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्या ना! धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा बोजवारा उडाला आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा विचारही सरकार करीत नाही!

११ लाख कोटीचे रस्ते होणार म्हणता तर त्याचे काम काय आकाशात चालले आहे का? नोटाबंदीस विरोध केला त्यावेळी लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. लोकांनी कमळाला मतदान केल्याने नगरसेवकही न होऊ शकणारे खासदार-आमदार झाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगून पवार म्हणाले, ही मंडळी सहकारी चळवळी मोडून काढायला निघाली आहेत. सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगण्याची वेळ नितीन गडकरी यांच्यावर का यावी? स्वच्छतेसाठी कर लावला. परंतु स्वच्छता मात्र दिसत नाही. शिवसेना तर सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही, असेही ते म्हणाले.

बँकेचे अध्यक्ष डॉ. बी. आर. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंटय़ाल जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, डॉ. निसार देशमुख, चंद्रकांत दानवे आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची थेट निवड का नको  ?

सरपंचासाठी थेट जनतेतून निवडणूक कशासाठी? सरपंच आणि सदस्य वेगळ्या विचारांचे आले तर कामं कशी होतील? पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्रीही सरळ जनतेतून निवडत का नाहीत? लोकशाहीचा खेळखंडोबा का करता? पूर्वी आम्ही नगराध्यक्षपदाच्या जनतेतून थेट निवडीचा निर्णय घेतला होता. परंतु अनुभवानंतर आम्हाला तो बदलावा लागला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भागातील बाजार समिती सध्याच्या निवडणूक पद्धतीने त्यांच्या ताब्यात येणार नाही म्हणून त्यांनी निवडणुकीच्या नवीन पद्धतीचा घाट घातला आहे, असेही पवार म्हणाले.