अजित पवार यांचा आरोप

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमधील मंत्री संवेदनशील नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परतूर तालुक्यातील आष्टी येथे केला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम कडपे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार राजेश टोपे, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

पवार म्हणाले, अधिक पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून भाव नसल्याने कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी पिके रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक धोरणे राबविली होती. परंतु सध्याचे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

मंत्रालयात मंत्रीच हजर राहात नसल्याने सामान्य जनतेची अडचण होत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा चेहरा असलेले सरकार नाही, जे शिक्षक विद्यार्थ्यांना कधीही छडी मारत नाही, त्यांच्यावरच पोलिसांच्या लाठय़ा-काठय़ा खाण्याची वेळी यावी, हे दुर्दैव होय. व्यंगचित्रामुळे दसरा मेळाव्यास गर्दी होणार म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात माफी मागितली, असेही ते म्हणाले.

जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी वाळूउपसा मंत्री असा केला होता. परंतु लगेच आपण हा उल्लेख चुकून केल्याचे ते म्हणाले होते. त्याचा संदर्भ देऊन अजित पवार म्हणाले, मुंडे चुकले नाहीत, कारण ते जनतेच्या मनातीलच बोलले आहेत. लोणीकर वाळूउपसा मंत्री नव्हे तर खड्डे मंत्रीही आहेत.

तटकरे, मुंडे, टोपे यांची भाषणेही यावेळी झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सध्याच्या सरकारला स्वारस्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्य़ातील भाजप ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली असल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे बळीराम कडपे यांनी सांगितले. खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि त्यांच्या मुलांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून कडपे म्हणाले, भोकरदनमध्ये दादा आणि भाऊ तर परतूरमध्ये भाऊ आणि भैय्या यांचीच चलती आहे!