राज्याने एक स्वच्छ, चांगल्या आणि निर्मळ मनाचा नेता गमावला आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते मंगळवारी आर.आर. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी अंजनी येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. आम्ही सर्वजण १९९०पासून एकत्र काम करत आहोत. मात्र, आर. आर. यांचे असे आकस्मिकरित्या निघून जाणे आमच्यासाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधी पक्ष असो किंवा सत्तेत असो आर. आर. पाटील यांनी प्रत्येक जबाबदारी निभावताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांनी कधीही फक्त स्वत:च्या मतदारसंघाचाच विचार केला नाही. प्रत्येकवेळी मी संपूर्ण महाराष्ट्राचा मंत्री आहे, याची जाण ठेवून त्यांनी काम केले. इतकेच नव्हे तर, जेव्हा त्यांना ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा, त्यांनी स्वत:हून गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्याची जबाबदारी स्विकारल्याची आठवण यावेळी अजितदादांनी सांगितली. या भागातील नक्षली आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. विधानसभेत असताना आर.आर. पाटील यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. याशिवाय, त्यांची समयसुचकता हा वाखाणण्याजोगा गुण होता. विधानसभेत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी उत्कृष्ट वक्ता, प्रश्नांची उत्तम जाण असणारा पहिल्या क्रमांकाच नेता म्हणून आर.आर. यांचे नाव घ्यावे लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागल्यानंतर त्यांनी उमेद न हरता, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सैनिक आहोत, आपण कधीही हरणार नाही, नेहमीच जिंकू असे सांगत पक्षाच्या नेत्यांना धीर दिला होता. त्यामुळे उत्तम संघटनकौशल्य आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी असणार नेता हरपल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.