माजी आमदार शालिनीताईंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

सरकार बनविण्यासाठी तडजोड म्हणून अजित पवारांसारख्या गुन्हेगाराला भाजपाने उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा असून हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी, माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. राज्यामध्ये कोणालाही बहुमत नाही. अशा अस्थिर स्थितीत भाजपचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  सरकार बनवताना राष्ट्रवादीची मदत घेण्याची वेळ आलेली दिसते आहे. परंतु हे करताना त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद द्यायला नको होते. ज्या माणसावर उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला आहे, ज्यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे, ज्यांच्यावर पैशाची मोठी अफरातफर केल्याचा आरोप आहे.

राज्य बँकेत घोटाळय़ाचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल झाला आहे अशा गुन्हेगार  माणसाला उपमुख्यमंत्रिपद देत भाजपाने काय साध्य केले हे कळत नाही. अजित पवारांविरुद्धची ही सर्व कारवाई आतापर्यंत भाजपाने केलेली असून आता त्याच पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करणे हे कुठल्याही तत्त्वात बसत नाही.

देवेंद्र फडणवीस यांना जर सरकार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याचा नाईलाजच असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील अन्य व्यक्तीस हे पद बहाल करावे. परंतु अजित पवारांना हे पद दिल्यास त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर मोठा प्रतिकूल परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गुन्हेगार माणसाला उपमुख्यमंत्री करत भाजपाला समाजात उजळ माथ्याने जाता येणार नाही, असा इशारा देत ही निवड रद्द करण्याची मागणी शालिनीताई यांनी या वेळी केली.