पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार असल्याची  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केली आहे. आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण – तरुणींनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. मात्र त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जनतेच्या भावनांची, समस्यांची यांना जाण नाही.दाराशी आलेल्या मराठा तरुणांना पोलिसांकरवी हुसकावलं. विद्यार्थी रडतायेत, आत्महत्येची मागणी करताहेत तरी,या सरकारला पाझर फुटत नाही अशा शब्दात अजितदादा पवार यांनी ट्वीट करुन नाराजी व्यक्त केली आहे. २०१४ च्या जीआरनुसार पात्र सर्वांना नोकरी मिळालीच पाहिजे. सहाय्यक मोटार वाहन परीक्षेला राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, त्यात दुमत नाही. पण खुल्या वर्गातल्या १३५ विद्यार्थ्यांना वगळलं, हा अन्याय आहे असेही अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

गाऱ्हाणं मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं असंही अजितदादा पवार यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.